Oman Ship Attack Pudhari
मुंबई

Oman Ship Attack: ओमानमध्ये ठार झालेल्या मुलाचे पार्थिव मायदेशी आणा; पित्याची मुंबई उच्च न्यायालयात धाव

दीक्षित सोलंकी असे मृत्यू पावलेल्या खलाशाचे नाव आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: ओमानच्या किनाऱ्याजवळ एका व्यापारी जहाजावर झालेल्या संशयित हल्ल्यात मृत्यू पावलेल्या मुलाचे पार्थिव मायदेशी आणून ताब्यात द्या, अशी मागणी संबंधिताच्या पित्याने केली आहे. तशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

दीक्षित सोलंकी असे मृत्यू पावलेल्या खलाशाचे नाव आहे. या हल्ल्यात मृत्यू पावलेला तेो पहिला भारतीय आहे. त्याचे वडील अमृतलाल सोलंकी आणि बहीण मिताली सोलंकी यांनी वकील एस. बी. तालेकर आणि माधवी अय्यप्पन यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत, अधिकाऱ्यांकडून स्पष्टतेचा अभाव असल्याचा दावा करण्यात आला आहे.

तसेच त्याचे पार्थिव मायदेशी लवकरात लवकर परत आणण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर सरन्यायाधीश श्री चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर 6 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

दीक्षित सोलंकी (25) हा तरुण एमटी एमकेडी व्योम या तेलवाहू जहाजावर खलाशी म्हणून काम करत होता. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान ओमानच्या किनाऱ्याजवळ स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन बोटीने त्याच्या जहाजावर हल्ला केला. 4 मार्च रोजी झालेल्या या हल्ल्यात दीक्षितचा मृत्यू झाला. आपल्या याचिकेत सोलंकी कुटुंबीयांनी सर्व तपास आणि न्यायवैद्यक नोंदी (फॉरेन्सिक रेकॉर्डस्‌‍) सह सामायिक करण्याची मागणीही केली आहे.

ही याचिका परराष्ट्र मंत्रालय, बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग मंत्रालय, नौकानयन महासंचालनालय आणि एमटी एमकेडी व्योम या जहाजाचे व्यवस्थापन करणाऱ्या व्ही शिप्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे.

याचिकेत केलेल्या मागण्या

  • मृत्यूनंतरही व्यक्तीला सन्मानाचा मूलभूत हक्क असतो. म्हणूनच मृतदेह वेळेवर कुटुंबाकडे परत पोहोचवणे हे संबंधित अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे.

  • सागरी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार समुद्रात मृत्यू झाल्यास मृतदेहाची योग्य हाताळणी केली पाहिजे.

  • संबंधिताचा मृतदेह मायदेशी परत पाठवण्याची कायदेशीर जबाबदारी पाळली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT