मुंबई : वांद्रे येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये परीक्षा अर्ज करताना धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्याना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना आपल्या नावाच्या जागी अवमानकारक व अश्लील शब्द तसेच शिवराळ शब्द दिसल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांना चुकीच्या माहितीमुळे परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात आल्याचे समजते.
वांद्रे येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलतिकीटसाठी अर्ज करताना त्यांच्या नावांच्या ठिकाणी काही अश्लील शब्द दिसल्याची तक्रार केली. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेतील विद्यार्थ्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात महाविद्यालयाच्या प्रणालीवर नोंदणी क्रमांक टाकून हॉलतिकीट अर्ज तयार करण्याचा प्रयत्न करताना त्यांच्या नावांच्या जागी शिवीगाळ करणारे शब्द दिसले. याबाबत विद्यार्थ्यांनी तत्काळ महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार केली, मात्र परीक्षेचा कालावधी आला तरी याकडे दुर्लक्ष केले, अशी तक्रारही विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या तक्रारींनंतर संस्थेने ‘एमआयएस’ प्रणाली बंद केल्याचे सांगितले. सोमवार सायंकाळपर्यंत प्रणाली सुरू झाली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून, या त्रुटीचे निराकरण कधी होणार याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
संस्थेच्या या तांत्रिक त्रुटीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आमच्या चुकांमुळे नाही, तर प्रणालीतील त्रुटीमुळे आमची सेमिस्टरची संधी वाया जाणार का? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच, अश्लील शब्द प्रणालीत कसे आले? त्याचे परीक्षण का वेळेवर झाले नाही? याचे स्पष्टीकरण पालकांनी मागितले आहे.
दरम्यान, तंत्र शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे मंगळवार दुपारीपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणावर अद्याप गव्हर्नमेंट पॉलिटेक्निककडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली गेलेली नाही. प्राचार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.
गेल्या आठवड्यात याबाबत तक्रार दिल्यानंतरही काहीच झाले नाही. सोमवारपर्यंत समस्या दूर होईल, असे सांगण्यात आले होते; पण परीक्षा सुरू झाली तरी आमची माहिती चुकीची असल्याने काहींना बसण्याची परवानगीच मिळाली नसल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले.