Anant Radhika Wedding
अंबानींच्या विवाहसोहळ्यात घुसखोरी file photo
मुंबई

अंबानींच्या विवाहसोहळ्यात घुसखोरी; यूट्यूबरसह दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेऊन बीकेसी पोलिसांच्या स्वाधीन केले.

लुकमान मोहम्मद शफी शेख आणि व्यंकटेश नरसैय्या अलुरी अशी या दोघांची नावे असून ते आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचे रहिवासी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. शनिवारी अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा विवाह सोहळा वांद्रे येथील बीकेसी, जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. मुंबई पोलिसांसह अंबानी यांची वैयक्तिक खासगी सुरक्षा व्यवस्था तिथे तैनात करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी तिथे एक तरुण विनापरवाना घुसखोरीचा प्रयत्न करत होता. उपस्थित सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याचे नाव व्यंकटेश असल्याचे उघडकीस आले. तो आंध्र प्रदेशचा रहिवासी असून यूट्यूबर आहे. त्याला हा विवाह सोहळ्याचे मोबाईलवर शूटिंग करायचे होते, जेणेकरून त्याला जास्तीत जास्त ह्यूवर मिळतील या आशेने तो तिथे आला होता. मात्र त्याला आत प्रवेश करण्यापूर्वीच सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले होते.

ही घटना ताजी असताना शनिवारी मध्यरात्री अडीच वाजता लुकमान शेख या तरुणाला जिओ वर्ल्ड सेंटरच्या पहिल्या मजल्यावरील मीटिंग रूम क्रमांक १०४ मधून सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले. लुकमान हा कर्नाटकच्या हुबळीचा रहिवासी असून, सध्या विरारच्या बोळींज नाका, जॉयविले अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याला हा विवाहसोहळा प्रत्यक्षात पाहायचा होता, त्यासाठी त्याने तिथे विनापरवाना प्रवेश केल्याची कबुली दिली. या दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर बीकेसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते.

SCROLL FOR NEXT