NSCI Dome Music Event Tragedy Pudhari
मुंबई

NSCI Dome Music Event Tragedy: एनएससीआय डोममधील कार्यक्रमात तरुणाचा मृत्यू; अन्य एका महिलेवर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू

या दोघांनी मद्यासह एनर्जी ड्रिंक्स घेतल्याचे उघडकीस आले असले तरी त्यांनी ड्रग्ज घेतले नव्हते.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: ताडदेवच्या एनएससीआय डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका संगीत कार्यक्रमादरम्यान वृषभ गांगुर्डे या २८ वर्षांच्या तरुणाचा अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला तर अन्य एका महिलेवर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांनी मद्यासह एनर्जी ड्रिंक्स घेतल्याचे उघडकीस आले असले तरी त्यांनी ड्रग्ज घेतले नव्हते. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

वृषभचा मृतदेह शव विच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठविण्यात आला. हाजीअली येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियाच्या डोममध्ये शनिवारी एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी पाच ते सहा हजार प्रेक्षक हजर होते.

हा कार्यकम सुरू असताना वृषभ या तरुणाची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्याला तातडीने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याच दरम्यान अन्य एका महिलेची प्रकृती बिघडली. तिला जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती आता स्थिर आहे. तिच्या चौकशीनंतर तिने संगीत कार्यक्रमांत मद्यासह एनर्जी ड्रिंक्स घेतल्याची कबुली दिली असली तिने ड्रग्जचे सेवन केले नाही, असे तिच्या जबानीत सांगितले.

प्राथमिक तपासात वृषभ यानेही मद्यासह एनर्जी ड्रिंक्स घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या शरीरात ड्रग्ज घेतल्याचे नमुने सापडले नाहीत. या घटनेनंतर कार्यक्रमांतील सीसीटीव्ही फुटेजसह डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. संगीत कार्यक्रमाच्या आयोजकासह इतर काहींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची जबानी नोंदविण्याचे काम सरू आहे.

या संगीत कार्यक्रमाला ताडदेव पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र आयोजकांनी वरिष्ठ पातळीवर हालचाल करून ही परवानगी घेतली होती. कार्यक्रमांत मद्य सेवनाची परवानगी घेण्यात आली होती याचा आता पोलिसांकडून तपास सुरू आहे. या कार्यक्रमासाठी काही हजार रुपयांचे शुल्क आकारण्यात आले होते. वृषभ हा त्याच्या काही मित्रांसोबत कार्यक्रमाला आला होता, त्यामुळे या मित्रांची चौकशी करून जबानी नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आयोजकावर गुन्हा दाखल

एनएससीआय डोम येथील संगीत कार्यक्रमा दरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी आज रात्री उशिरा आयोजक असलेल्या कंपनीच्या सीईओ आणि मॅनेजर विरोधात गुन्हा नोंद केला. बीएनएस कलम १०६ (१),२८९ नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT