मुंबई : राजन शेलार
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी नेहमीच भाजपला साथ दिली आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत येथील मतदारांनी शिवसेनेलाही तितकीच साथ दिली आहे. तथापि, शिवसेनेत पडलेली फूट, भाजपची वाढलेली ताकद, उत्तर मुंबईत परप्रांतीयांची वाढलेली संख्या यामुळे निवडणुकीची समीकरणे बदललेली आहेत. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत उद्धव सेना आणि मनसेची पूर्ण मदार मराठी मतदारांवर अवलंबून असली तरी उत्तर मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधूंचा थेट सामना होणार हे निश्चित.
राजकीय सत्तासंघर्षांतील बंडाळीनंतर प्रथमच महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा दहिसर ते मालाडपर्यंत पसरलेला आहे. या मतदारसंघातील दहिसर, बोरिवली, चारकोप आणि कांदिवली या चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर मागाठाणे येथे शिंदे सेना व मालाड पश्चिम येथे काँग्रेसचा आमदार आहे. ठाकरे किंवा मनसेचा एकही आमदार येथे नाही. बोरिवली पश्चिम, कांदिवली पश्चिम, मालाड परिसरात गुजराती, जैन मारवाडी यांचे मोठे प्राबल्य आहे. तर दहिसर, मागाठाणे, बोरिवली पूर्व, कांदिवली पूर्व भागात मराठी, दलित आणि उत्तर भारतीय मतदारांचे वर्चस्व आहे.
शिवसेनेतील बंडाळीपूर्वी येथे म्हणजे 2017 च्या पालिका निवडणुकीत उत्तर मुंबईतून शिवसेनेचे 18 हून अधिक तर भाजपचे 23 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले होते. मात्र, शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर येथील बहुतांश नगरसेवक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधूच्या एकजुटीमुळे ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. हे पाहता ठाकरे बंधूंच्या जागावाटपात उद्धव सेना 31 जागांवर, तर मनसे 10 जागांवर लढत आहे. त्याचबरोबर महायुती म्हणून भाजप 27 जागांवर तर शिंदे सेना 11 जागांवर उभी ठाकली आहे.
मुंबईत उद्धव सेनेतील आदित्य ब्रिगेडच्या अनेक कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी मिळाली आहे. दहिसरमध्ये भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांच्यासाठी एकप्रकारे कसोटी ठरणार आहे.
उद्धव सेनेचे माजी आमदार, उपनेते विनोद घोसाळकर यांची सून तेजस्विनी घोसाळकर या भाजपमध्ये गेल्याने प्रभाग क्रमांक 2 मधून युवा सेनेची कार्यकर्ती धनश्री कोलगे हिला उमेदवारी मिळाली आहे.
कांदिवलीत शिंदे सेना, काँग्रेस, उद्धव सेना युती अशी तिरंगी लढत होणार आहे. मात्र, येथे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांना येथील मतदारांनी नेहमीच पाठिंबा दिला आहे. कांदिवली पश्चिममध्ये मराठी बरोबरच गुजराती आणि उत्तर भारतीयांची मते निर्णायक ठरली आहेत. येथील मराठी भाषिक हा नेहमीच शिवसेनेच्या पाठिशी राहिला आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर विभागलेल्या मतांचा कोणावर परिणाम होतो, हे अवघ्या काही दिवसांत दिसून येणार आहे. मालाड पश्चिम हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो.