मुंबई ः जुलै महिन्यात विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार्या नितीन देशमुख यांना हायकोर्टाने दिलासा दिला. याचिका निकाली निघेपर्यंत या प्रकरणाचा तपास थांबवा, असे आदेश मुख्य न्या. श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अखंड यांच्या खंडपीठाने मरीन ड्राईव्ह पोलिसांना देत सुनावणी 12 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. आमदार आव्हाड यांनी पडळकर यांना मंगळसूत्र चोर असे उद्देशून म्हटल्याने विधानभवनाच्या लॉबीत आव्हाड, पडळकर समर्थकांमध्ये राडा झाला. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नितीन देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
हा गुन्हा रद्द करा अशी विनंती करत देशमुख यांनी अॅड. राहुल आरोटे यांच्या मार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर बुधवारी मुख्य न्या. श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. आरोटे यांनी कोणताही गुन्हा सिद्ध होत नसतानाही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात खोट्या व क्षुल्लक तक्रारीच्या आधारे तक्रार दाखल करण्यात आली होती.