Pudhari Maha Icon 2026 Pudhari
मुंबई

Pudhari Maha Icon 2026: जीवनगौरव पुरस्कार हा कामाला स्वल्पविराम; उद्योजक हिरानंदानी यांचे उद्‌गार

हा जीवनगौरव पुरस्कार कामाला विराम नसून स्वल्पविराम आहे, अशी भावना सुप्रसिद्ध उद्योजक हिरानंदानी ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केली.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: दैनिक पुढारी समूहाने जीवनगौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दिला याचा आनंद होत आहे. जीवनगौरव पुरस्कार म्हणजे कामाला विराम असे म्हटले जाते. मात्र हा जीवनगौरव पुरस्कार कामाला विराम नसून स्वल्पविराम आहे, अशी भावना सुप्रसिद्ध उद्योजक हिरानंदानी ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केली.

गुरुवारी मुंबईत झालेल्या पुढारी ‘महा-आयकॉन्स :२०२६’ पुरस्कार सोहळ्यात डॉ. हिरानंदानी बोलत होते. ते म्हणाले, गेल्या फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विद्यापीठातर्फे डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. त्यावेळी ते मला म्हणाले, आता नवीन काय स्टार्ट करणार आहात.

गडकरी यांनी शिकवले आहे, कधीच थांबायचे नाही, काम करत राहायचे. डॉ. अनिल काकोडकर हे वयाच्या 80 व्या वर्षीदेखील आपला देश एनर्जीमध्ये आत्मनिर्भर बनवण्यासाठी नवीन आयडिया घेऊन काम करीत आहेत, याचा मला खूप आनंद आहे. त्यामुळे जीवनगौरव पुरस्कार म्हणजे विराम नसून स्वल्प विराम होय, असे मला वाटते.

देशाची अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन बनविण्याचा संकल्प करण्यात आला असताना मुंबईची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन बनविण्याच्या दृष्टीने उद्योग मंत्री उदय सामंत हे नियोजन करीत आहेत. सामंत हे आता गडकरी यांच्या बाजूला बसले आहेत, त्याचा नक्कीच त्यांना फायदा होईल,असेही डॉ. हिरानंदानी म्हणाले.

दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव आणि अध्यक्ष योगेश जाधव हे खूप उत्तम काम करीत आहेत. त्यांनी माझा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल मी पुढारी समूहाचा आभारी आहे, अशी कृतज्ञताही डॉ. हिरानंदानी यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी, राष्ट्रवादी सुनेत्रा पवार गट प्रवक्ते ⁠सूरज चव्हाण, ग्रंथाली प्रकाशनचे ⁠सुदेश हिंगलासपूरकर, माजी सहायक पोलीस आयुक्त ⁠धनराज वंजारी, अभिनेता सचिन देशपांडे, अभिनेत्री स्मितल हळदणकर, अभिनेता अथर्व मराठे, संगीतकार निलेश मोहऱीर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT