मुंबई : देशात पश्चिम बंगाल राज्यात निपाह विषाणूची एन्ट्री झाली असली, तरी महाराष्ट्रासाठी अद्याप कोणत्याही विशेष मार्गदर्शक सूचना (गाईडलाईन्स) जारी करण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे प्रचंड मृत्यूदर असलेल्या या विषाणूचे दोन रुग्ण भारतात आढळल्यानंतरही प्रवासावर कोणतेही निर्बंध घालण्याची गरज नसल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
पश्चिम बंगालमध्ये निपाहचे दोन रुग्ण आढळून आले असून केंद्र सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. राज्य आरोग्य विभागाकडून नियमित सर्व्हेलन्स, संसर्गजन्य आजारांवरील नेहमीच्या प्रोटोकॉलनुसारच कामकाज सुरू असून, गरज भासल्यास तत्काळ विशेष गाईडलाईन्स जारी केल्या जातील, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भारतात निपाहचे दोन रुग्ण आढळताच मलेशियाने आपल्या नागरिकांना सतर्क करीत भारतात प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले की, भारतात निपाह पसरण्याचा धोका अत्यंत कमी आहे. त्यामुळे प्रवासावर निर्बंध घालण्याची गरज नाही. पश्चिम बंगालमध्ये आढळलेल्या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 196 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी कुणालाही लागण झालेली नाही. या दोघांशिवाय तिसरा रुग्ण आढळलेला नाही.त्यामुळे पश्चिम बंगालातून भारताच्या अन्य राज्यांत किंवा अन्य देशांमध्ये हा आजार पसरण्याची शक्यता नाही.
जगभरात निपाह विषाणू घातक मानला जातो. याचा मृत्युदर तब्बल 90 टक्के आहे. पश्चिम बंगालात आढळलेले दोन्ही रुग्ण कॉरंटाईन करण्यात आले असून वैद्यकीय सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वटवाघळांपासून या साथीच्या आजाराची लागण होते. हे लक्षात घेऊन खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.