नवी दिल्ली/मुंबई : वृत्तसंस्था
केंद्रीय गृह मंत्रालयाने पाठवलेल्या प्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) महासंचालक सदानंद वसंत दाते यांची मुदतपूर्व त्यांच्या मूळ कॅडरमध्ये, म्हणजेच महाराष्ट्र केडरमध्ये रवानगी करण्यास मंजुरी दिली आहे.
सदानंद दाते हे 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्राच्या विद्यमान पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपत आहे. त्यानंतर दाते हे महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, दाते यांना तातडीने महाराष्ट्रात परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अत्यंत अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी
सदानंद दाते यांनी 31 मार्च 2024 रोजी एनआयएचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. त्यापूर्वी, त्यांनी महाराष्ट्रात दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख, मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलिस आयुक्त, तसेच मुंबईत कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त म्हणून महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांनी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो आणि केंद्रीय राखीव पोलिस दलामध्येही उल्लेखनीय सेवा दिली आहे.
26/11 च्या हल्ल्यातील शौर्य
मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी दाते यांनी दाखवलेल्या शौर्याचे आजही कौतुक केले जाते. 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला तेव्हा प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचणाऱ्या पहिल्या काही अधिकाऱ्यांपैकी ते एक होते. अबू इस्माईल आणि अजमल कसाब या दहशतवाद्यांशी लढताना ते जखमी झाले होते, मात्र त्यांच्या समयसूचकतेमुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचले.