पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) पथकाने आज (दि. १०) भारतात आणले. या मोहिमेची जबाबदारी 'एनआयए' प्रमुख सदानंद दाते (NIA Chief Sadanand Date) यांच्याकडे होती. विशेष म्हणजे २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी सदानंद दाते यांनी दशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. आज त्याच दातेंनी या हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकेहून भारतात आणण्याची जबबादारी पार पाडली आहे. (Tahawwur Rana Extradition)
महाराष्ट्राचे सुपुत्र, आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे मुळचे पुण्याचे आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून डॉक्टरेट केली आहे. १९९०च्या बॅचचे महाराष्ट्र केडरमधील आयपीएस अधिकारी असणारे सदानंद दाते यांची अतिशय कुशल अधिकारी अशी ओळख आहे. यापूर्वी त्यांनी मिरा भाईंदर, वसई, विरार आयुक्तालयाचे आयुक्त, मुंबईच्या क्राईम ब्रांचचे सहआयुक्त अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. मिरा भाईंदर, वसई-विरार हे आयुक्तालय पूर्ण उभे करण्याची जबाबदारी त्यांनी एक हाती सांभाळली होती. दाते यांची ओळख अत्यंत चिकाटीचे अधिकारी अशी आहे. मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेत काम करत असताना ते सकाळी ८.३० ते रात्री ९.३० पर्यंत कार्यालयात असायचे.
दाते यांनी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) तसेच सीआरपीएफमध्ये प्रतिनियुक्तीवर सेवा बजावली आहे. सदानंद दाते यांची एक वर्षापूर्वी एनआयएचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी ते महाराष्ट्राचे 'एटीएस' प्रमुख होते. आता २०२६ पर्यंत ते एनआयएचे महासंचालक म्हणून काम पाहणार आहेत.
२६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात त्यांनी धडाडीची कामगिरी बजावली होती. कामा हॉस्पिटल येथे दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या महिला आणि मुलांची सुटका दाते यांच्यामुळे होऊ शकली होती. त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले होते.