पुढारी ऑनलाईन डेस्क : २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात ( 26/11 Mumbai terror attack) सहभागी असलेला दहशतवादी तहव्वुर राणा (Tahawwur Rana ) त्याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची विनंती करणारी याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे त्याला भारतात परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष विमानाने तो उद्या ( गुरुवार,10 एप्रिल) भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. त्याच्यासोबत भारतीय गुप्तचर आणि तपास अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक असणार आहे, असे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.
पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वुर राणा (वय ६४) लवकरच अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित केला जाऊ शकतो. भारतातील तपास यंत्रणांचे पथक अमेरिकेत पोहोचले आहे. सध्या हे पथक अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत सर्व कागदपत्रे आणि कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यात व्यस्त आहे. राणाच्या प्रत्यार्पणाची प्रक्रियेला वेग आला आहे.
राणाने आपले प्रत्यार्पण थांबवण्यासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात आपत्कालीन याचिका दाखल केली होती. अर्जात त्याने दावा केला होता की तो पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम आहे, त्यामुळे भारतात त्याचा छळ केला जाईल, म्हणून त्याचे प्रत्यार्पण थांबवावे. राणा यांनी त्यांच्या खराब प्रकृतीचे कारणही दिले होते. मागील महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने तहव्वुरची याचिका फेटाळून लावली होती.
राणा सध्या लॉस एंजेलिसमधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये आहे. तहव्वुर राणा हा २६/११ हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीचा जवळचा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने गेल्या महिन्यात राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी घोषणा केली होती की, "मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एकाचे भारतात न्यायासाठी प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली आहे."
२६ नोव्हेंबर २००८ रोजी १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अरबी समुद्र ओलांडून समुद्री मार्गाने मुंबईत घुसखोरी केली. रेल्वे स्टेशन, दोन हॉटेल्स आणि एका ज्यू केंद्रावर एकाचवेळी हल्ला केला होता. सुमारे ६० तास चाललेल्या या हल्ल्यात १६६ नागरिक ठार झाले होते. या हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. दहशतवादी अजमल अमीर कसाबला जिवंत पकडण्यात आले. नोव्हेंबर २०१२ मध्ये कसाबला पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली होती.