मुंबई : शेवटच्या घरापर्यंत बँकिंग सेवा पोहोचावी म्हणून खात्यावर किमान रक्कम ठेवण्याच्या अटी शिथिल केल्या जात असताना आयसीआयसीआय या दुसर्या क्रमांकाच्या मोठ्या बँकेने बचत खात्यावरील किमान रकमेची मर्यादा थेट 50 हजार रुपये केली आहे.
आतापर्यंत आयसीआयसीआयच्या खातेदारांना आपल्या बचत खात्यावर किमान 10 हजार रुपये महिन्याला ठेवणे बंधनकारक होते. 1 ऑगस्टपासून बँकेने ही मर्यादा वाढवली. अर्धनागरी विभागातील नव्या खातेदारांना महिन्याला किमान 25 हजार रुपये खात्यावर ठेवावे लागतील. शहरी म्हणजेच नागरी विभागातील नव्या खातेदारांसाठी हीच मर्यादा 50 हजार रुपये करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नव्या बचत खातेदारांनाही 10 हजार रुपये ठेवावे लागतील. अर्धनागरी तथा ग्रामीण भागातील जुन्या खातेदारांना ही वाढ लागू नाही. त्यांच्यासाठी 5 हजार रुपयांची मर्यादा कायम असेल.
जे खातेदार किमान रक्कम खात्यावर ठेवणे अपयशी ठरतात त्यांना या मर्यादेसाठी कमी पडणार्या रक्कमेवर 6 टक्के किंवा 500 रुपये दंड आकारला जातो. विशेष म्हणजे बचत खात्यावरील रकमेवर दिले जाणारे व्याज आयसीआयसीआय बँकेने घटवले आहे. 50 लाख रुपयांपर्यंतची रक्कम बचत खात्यात असेल तर फक्त 2.75 टक्के व्याज मिळते. दुसरीकडे याच खात्यात 50 हजार रुपये पडून राहू देणे सक्तीचे करताना बँकेने दंडाचा बडगा कायम ठेवला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ही भारतातील तिसर्या क्रमांकाची बँक होय. एसबीआयने आपल्या बचत खात्यांवरील किमान रकमेची अट 2020 मध्येच रद्द करून टाकली. भारतातील बहुतांश बँकांच्या किमान रकमेच्या मर्यादा या 2 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. मात्र, ही मर्यादा शहरी भागांसाठी थेट 50 हजार रुपयांपर्यंत वाढवणारी आयसीआयसीआय पहिली बँक ठरली आहे.