New Mumbai Airport Name Controversy :
नवी मुंबई: पुढारी वृत्तसेवा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे. या मागणीच्या अनुषंगाने केंद्र सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी भूमिपुत्रांचा आणि दिबा समर्थकांचा येत्या दिनांक ६ ऑक्टोबर सोमवारी सकाळी १० वाजता गणपतशेठ तांडेल मैदान करावे गाव ते नवी मुंबई विमानतळ रेती बंदर असा विराट धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी भिवंडी लोकसभेचे आणि भूमिपुत्रांचे विद्यमान खासदार श्री सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत नवी मुंबई विमानतळ सुरू होण्यापूर्वी विमानतळाला राष्ट्रीय लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे आणि तसे अधिकृत नोटिफिकेशन काढून घोषित करावे, अन्यथा सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्रांचा आणि दिबा समर्थकांचा विराट असा मोर्चा निघणार, असा इशारा यावेळी केंद्र सरकारला दिला.
त्यामुळे येत्या ६ ऑक्टोबर पूर्वी सकारात्मक निर्णय झाल्यास जल्लोष करू अथवा नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्र आणि दिबा समर्थक लाखोंच्या संख्येने धडकणार असा इशारा दिला. यावेळी नवी मुंबई, ठाणे, पालघर, भिवंडी, डोंबिवली, मुंबई आणि रायगडचे संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.राज्य सरकारने कॅबिनेट आणि विधिमंडळात प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकर कडे पाठवला आहे, राज्य सरकारच्या प्रस्तावचा आम्ही समर्थन करतो. केंद्राने दिरंगाई करून राज्य सरकारच्या आणि जनतेच्या भावांनाचा अनादर करू नये असा इशारा यावेळी दिला.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील पहिल्या फळीचे नेते, कुळ कायद्याची अंमलबजावणी करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या कसणार्या शेतकर्यांना जमिनीचे मालक बनवणारे नेते, जमिनीच्या बदल्यात जमीन हा कायदा प्रस्थापित करणारे, नवीन भूसंपादन पुनर्वसन आणि पुनरस्थापना कायद्याची पायाभरणी करणारे नेते, स्त्रिभृण हत्या विरोधी कायदा देशाला देणारे, ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात महाराष्ट्र आणि देशाचे नेतृत्व करणारे नेते, पाच वेळा आमदार, दोन वेळा खासदार तरी ही स्वतःचे घर न बांधू शकणारी निस्वार्थ व्यक्ती आणि त्यांच्या भूमीत होणार्या विमानतळाला त्यांचे नाव देण्यात दिरंगाई होत असेल तर ते कदापी खपून घेतले जाणार नाही, याबाबत जनतेच्या भावना तीव्र आहेत आणि मी जनते सोबत आहे असे मत खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी व्यक्त केले.