मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित स्वायत्त महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमांची एकसंध आणि गुणवत्तापूर्ण रचना करण्यासाठी विद्यापीठाने नवी नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला असून, त्यास विद्या परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाशी सलग्नित विविध स्वायत्त महाविद्यालयांमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध अभ्यासक्रमांसाठी नियमावली तयार करण्याची बाब विद्या परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आली. यानुसार आता सर्व स्वायत्त महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमांची रचना करावी लागणार आहे. तसेच या अभ्यासक्रमांचे नामाभिधान हे सर्व शिखर संस्थांच्या नियमावलींनुसार असणार आहे.
त्याच बरोबर विद्यापीठाची उत्तीर्णतेची योजना ( पासिंग स्कीम), स्टँडर्ड ऑफ पासिंग यांचे काटेकोर पालन आणि सर्व वैधानिक संस्था यांच्या नियमनाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. यासाठीचे परिपत्रक लवकरच विद्यापीठाकडून जाहीर केले जाणार आहे.
मुंबई विद्यापीठातील 135हून अधिक स्वायत्त महाविद्यालयांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, शैक्षणिक स्वायत्तता आणि गुणवत्तेचा समतोल साधण्याचा प्रयत्न यातून साधला जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेत 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षासाठी ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्च या दोन पर्यायांच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून या बदलांची अंमलबजावणी होणार आहे. 8 सत्रांमध्ये पूर्ण होणाऱ्या या अभ्यासक्रमात तिसरे वर्ष पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षासाठी पर्याय निवडता येणार आहे.
ऑनर्स विथ रिसर्च
या पर्यायात विद्यार्थ्यांना त्यांच्या मुख्य विषयात 12 क्रेडिट्सचा संशोधन प्रकल्प किंवा प्रबंध पूर्ण करावा लागेल. हा प्रकल्प सातव्या आणि आठव्या सत्रात पूर्ण केला जाईल. यासाठी पात्रता 7.5 सीजीपीए अशी असेल. चौथे वर्ष सुरू करण्यासाठी संबंधित महाविद्यालयाकडे पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा संशोधन केंद्र असणे आवश्यक आहे. ज्या महाविद्यालयांकडे पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जातात त्याना 4 वर्षीय ऑनर्स पदवी अभ्यासक्रम राबवता येईल. तसेच ज्या महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासह संशोधन केंद्र आहे त्याना 4 वर्षीय ऑनर्स पदवी अभ्यासक्रम राबवता येईल. विशेष म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष हे 4 वर्षांच्या ऑनर्स पदवीच्या चौथ्या वर्षाशी सुसंगत ठेवण्यात येणार आहे.
नॅनो सायन्स व टेक्नॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षाची प्रवेश पात्रता
मुंबई विद्यापीठाच्या एमएससी नॅनो सायन्स व नॅनो टेक्नॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षाची प्रवेश पात्रता आजच्या विद्या परिषदेच्या बैठकीत निश्चित करण्यात आली असून 4 वर्ष अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याना एमएससी नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रविष्ट होता येईल. पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशानंतर दोन अनिवार्य अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या एकत्रीकरणामुळे सेमिकंडक्टर, बॅटरी तंत्रज्ञान आणि ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचे विद्यार्थ्यांना विस्तृत अध्ययन आणि संशोधन करता येईल तसेच करिअरच्या विविध संधींचे दालन यामुळे खुले होईल.