Jail Pudhari
मुंबई

NESCO Case: नेस्को ड्रग प्रकरणात १४ वा आरोपी अटकेत

आर्थिक व्यवहारांच्या तपासातून नितेश खेमलानीचा सहभाग उघड

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन मैदानावरील संगीत महोत्सवादरम्यान अमली पदार्थांच्या कथित अतिसेवनामुळे दोन एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेल्या बहुचर्चित प्रकरणात वनराई पोलिसांनी १४ वा आरोपी नितेश ऊर्फ 'निक' खेमलानी याला अटक केली. तो या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार महेश ऊर्फ 'मार्क' खेमलानी याचा जुळा भाऊ असल्याचे तपासात समोर आले.

पोलिसांच्या तपासात आरोपींमधील संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि ड्रग्ज रॅकेटशी संबंधित आर्थिक साखळीचा तपास सुरू असताना नितेश खेमलानीचे नाव समोर आले.

त्यानंतर वनराई पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई मुंबई पोलिसांनी न्यायालयात सुमारे ३,५०० पानी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर लगेच केली आहे. दोषारोपपत्रात व्हॉट्सअॅप चॅट्स, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल फॉरेन्सिक, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि आर्थिक व्यवहारांचा तपशील समाविष्ट आहे.

कार्यक्रमापूर्वी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पिल्स उपलब्ध असतील' असा संदेश पाठविण्यात आल्याचा उल्लेखही तपासातील महत्त्वाचा पुरावा म्हणून मानला जात आहे. पोलिसांकडून नितेश खेमलानीची भूमिका, त्याचा आर्थिक व्यवहारांतील सहभाग आणि ड्रग्ज पुरवठा साखळीशी असलेले संबंध तपासले जात आहेत.

या चौकशीतून आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. या प्रकरणात एप्रिल महिन्यात नेस्को येथे आयोजित संगीत महोत्सवादरम्यान कथितरित्या एक्स्टसी गोळ्यांचे सेवन केल्यानंतर दोन एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वनराई पोलिसांनी व्यापक तपास सुरू करून आतापर्यंत १४ आरोपींना अटक केली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT