मुंबई : अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांना हटकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरेश दिनकर साळवे (६१) यांच्यावर तरुणांनी दगडाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी नेरूळमध्ये घडली. या हल्ल्यात साळवे रक्तबंबाळ होऊन जागीच कोसळले. त्यांना तातडीने कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चार दिवसांनी शनिवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूर येथील रहिवासी सुरेश साळवे हे नेरुळ परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे चालक म्हणून काम करत होते. १ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास ते नेरुळ सेक्टर २० मधील तेरणा रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या बालाजी गार्डन परिसरातून जात होते.
यावेळी काही तरुण अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या या प्रकाराला त्यांनी आक्षेप घेत तरुणांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, नशेत असलेल्या तरुणांनी साळवे यांच्या डोक्यात दगड घालून यांना गंभीर जखमी केले.
त्यानंतर त्यांच्याकडील सँगबॅग, सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १७ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून हल्लेखोरांनी पळ काढला. वर्दळीच्या परिसरात सकाळीच एका ज्येष्ठ नागरिकावर हल्ला करून लूट केली जात असेल, तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची असा संतप्त सवाल स्थानिकांकडून केला जात आहे.
केवळ गुन्हा दाखल करून तपास करण्यापुरती कारवाई न करता परिसरातील संशयित ठिकाणांवर नियमित गस्त, अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करणा-यांविरोधात धड़क मोहीम, तसेच रात्रीच्या वेळी विशेष पोलीस बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
नेरुळ बनले नशेखोरांचा अड्डा
नेरूळ सेक्टर २० मधील बालाजी गार्डन परिसरात विविध धर्माची भव्य मंदिरे, चर्चेस असून सकाळपासून रात्रीपर्यंत भाविक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, याच परिसरात अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या संशयित व्यक्तींचा वावर असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून केल्या जात आहेत.
पोलिसांनी कारवाई करत गांजा, ड्रगचे रॅकेट या परिसरातून उध्वस्त केले आहे. रेल्वे स्थानक परिसरातील मारामाऱ्या, स्थानकाजवळील कथित अवैध दारूविक्री, अंमली पदार्थांच्या विक्रीचे प्रकार आणि भंगाराच्या दुकानांमधून होत असलेले अंमली पदार्थ विक्रीचे प्रकार समोर आले आहेत.