

उरण : अटल सेतूच्या उड्डाण पुलाखालून जाणाऱ्या एनएच ३४८ ए या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. जवळ जवळ दोन ते अडीच फुट पाणी येथे नेहमी असते. जासई शंकर मंदिराजवळील या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला असून वाहनचालक व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जासई शंकर मंदिराजवळ ज्या ठिकाणी रस्ता अर्धवट अवस्थेत आहे, तसेच अटल सेतूवरून उतरणारी मार्गिका एनएच ३४८ ए या रस्त्याला जोडली जाते, नेमक्या त्याच ठिकाणी हे पाणी साठले आहे. पुलाखालून ये-जा करणाऱ्या वाहनांना या साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. रस्त्याच्या मोठ्या भागावर पाण्याचा थर असल्याने खड्डे, रस्त्याची खरी स्थिती व कडेचे अडथळे वाहनचालकांना दिसत नाहीत.
पाण्यामुळे येथे यापूर्वी लहान-मोठे अपघात झाल्याचे सांगण्यात येते. साचलेले पाणी वाहनांच्या इंजिनमध्ये शिरत असल्याने अनेक लहान वाहने तसेच दुचाकी भर रस्त्यात बंद पडतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते आणि मागून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे धोका अधिक वाढतो. या मार्गावर कंटेनर वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांची मोठी वर्दळ असल्याने दुचाकीस्वार व छोट्या वाहनचालकांसाठी हा प्रवास अधिकच जोखमीचा ठरत आहे.
विशेष म्हणजे, हे पाणी एक-दोन दिवसांचे नसून अनेक महिन्यांपासून या ठिकाणी साचत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळा संपल्यानंतरही पाणी ओसरत नसल्याने त्याचा स्रोत कोणता, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे असूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) किंवा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांना हे पाणी बंद करण्यात किंवा त्याचा निचरा करण्यात अद्याप यश आलेले नाही, अशी नाराजी स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
जासई भागातून उड्डाण पुलाखालून येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व वाहनांना या समस्येचा दैनंदिन त्रास सहन करावा लागत आहे. कामावर जाणारे नोकरदार, स्थानिक नागरिक, तसेच मालवाहतूक करणारे चालक यांना वेळेचा अपव्यय व वाहनांच्या दुरुस्तीचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचे मूळ कारण शोधून तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करावे, तसेच पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य गटार व्यवस्था उभारावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे. मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्यापूर्वी संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालावे.
सुरेश पाटील कामगार नेते, उरण