NEET UG Re Exam Pudhari
मुंबई

NEET UG Re Exam: भौतिकशास्त्राचा पेपर ठरला आव्हानात्मक

नीट पुनर्परीक्षा राज्यभर सुरळीत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर देशभरात पुन्हा घेण्यात आलेली वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट-यूजी) रविवारी मुंबईसह राज्यभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरळीत पार पडली.

परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, बायोमेट्रिक पडताळणी, मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी आणि वेळेचे काटेकोर पालन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या मते, पुनर्परीक्षेत भौतिकशास्त्राचा पेपर तुलनेने अधिक कठीण ठरला.

गेल्या ३ मे रोजी झालेल्या नीट-यूजी परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) २१ जून रोजी पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबईतील सुमारे ६३ केंद्रांसह राज्यभरात परीक्षा घेण्यात आली. राज्यातून २ लाख २२ हजार ९०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

दुपारी २ वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दुपारी १.३० वाजेपर्यंत केंद्रांवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अनेक केंद्रांबाहेर विद्यार्थी व पालक सकाळपासूनच दाखल झाले होते.

रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवारचा नियोजित मेगाब्लॉक रद्द केला. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन बेस्ट प्रशासनाने २४ मार्गांवर ६० विशेष बसगाड्या चालवल्या. याशिवाय एसटीच्या अतिरिक्त बसगाड्यांचीही मदत घेण्यात आली. कुर्ला, दादर, मालाड, मुलुंड आदी भागांतील परीक्षा केंद्रांपर्यंत विद्यार्थ्यांना पोहोचण्यासाठी या व्यवस्थेचा मोठा फायदा झाला.

परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयातील केंद्रावर काही विद्यार्थ्यांना उशिरा पोहोचल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली. संबंधित विद्यार्थ्यांनी प्रवेश काही मिनिटे आधीच बंद केल्याचा आरोप केला. मात्र, केंद्र प्रशासनाने नियमानुसार दुपारी १.३० वाजताच प्रवेशद्वारे बंद करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

काही केंद्रांवर विद्यार्थ्यांना पारदर्शक पाण्याच्या बाटल्या नेण्यास मनाई करण्यात आल्याची तक्रार पालकांनी केली. एनटीएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शक बाटल्या नेण्यास परवानगी असतानाही नवी मुंबई, चेंबूरसह काही केंद्रांवर विद्यार्थ्यांना त्या आत नेऊ दिल्या जात नसल्याचा आरोप करण्यात आला. काही पालकांनी केंद्रांवर पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचे सांगितले. एका पालकाने तर मुलाने संपूर्ण परीक्षा पाणी न पिता दिल्याचा दावा केला.

चेंबूर आणि नवी मुंबईतील एका केंद्रावर परीक्षेदरम्यान काही काळ वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रारही समोर आली. काही केंद्रांवरील वर्गखोल्यांमधील जुने पंखे, अपुरी सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी असुविधाजनक वातावरणाबाबतही पालकांनी नाराजी व्यक्त केली. एका विद्यार्थिनीला परीक्षा केंद्रात चप्पल काढण्यास सांगितल्याची तक्रारही करण्यात आली.

परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी यंदाची प्रश्नपत्रिका मागील परीक्षेपेक्षा अधिक कठीण असल्याचे सांगितले. मुलुंड येथील प्रियल दवे हिने भौतिकशास्त्रातील प्रश्नांनी अधिक वेळ घेतल्याचे नमूद केले. ठाण्यातील मेहक देढिया हिने जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र तुलनेने सोपे, तर भौतिकशास्त्र अधिक आव्हानात्मक असल्याचे सांगितले.

नभा सपाटे हिनेही एकूणच प्रश्नपत्रिका मागील परीक्षेपेक्षा कठीण असल्याचे सांगत जीवशास्त्राचा पेपर चांगला गेला, मात्र भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातील काही प्रश्न सोडवताना अडचणी आल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT