Mumbai Water Crisis: तुंबणारे पाणी अडवले तरी अर्ध्या मुंबईची तहान भागेल; रोज तब्बल २० टक्के पाण्याची गळती अन्‌ चोरी

दहिसर नदीवर धरण बांधण्याची केवळ चर्चाच
Mumbai Water Crisis
Mumbai Water Crisisfile photo
Published on
Updated on

राजेश सावंत

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात मुंबईत तुंबणाऱ्या पाण्यापैकी काही पाणी अडवले तरी मुंबईकरांची तहान भागू शकते.

एवढेच काय तर दहिसर नदीवर धरण बांधून मोठ्या प्रमाणात पाणी अडवता येऊ शकते. या नदीवर धरण बांधण्याची काही वर्षांपूर्वी चर्चा झाली पण प्रत्यक्षात राबतावर प्रकल्प उतरला नाही.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे ठाणे जिल्ह्यातील धरण आटत आल्यामुळे मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. याला सर्वस्वी मुंबई महापालिका जबाबदार आहे. एक वर्ष धरण क्षेत्रात पाऊसच झाला नाही, असे गृहीत धरले तर मुंबईत पाणीयुद्ध पेटल्याशिवाय राहणार नाही.

मुंबईत दरवर्षी सरासरी तीन ते साडेतीन हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस होतो. हा पाऊस जवळपास मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्राइतका आहे. पण मुंबई तुंबणाऱ्या पाण्यापैकी एक थेंबही पाणी महापालिका साचवू शकलेली नाही.

Mumbai Water Crisis
BEST Workers Strike: बेस्टचा संप अखेर मागे; बैठकीनंतर मोठा निर्णय

ठाणे जिल्ह्यातील तलावाप्रमाणे मुंबई उपनगरात पाणी साठवण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या नद्यांचा उपयोग करता आला असता. पण पालिकेच्या दुर्लक्षामुळे या नद्यांचे नाल्यांमध्ये रूपांतर झाले.

मिठीसह दहिसर, ओशिवरा, पोयसर या नद्या ज्या नॅशनल पार्कमधून उगम पावतात तेथे धरण बांधून पाणी अडवता आले असते. या अगोदर म्हणजे शंभर वर्षांपूर्वी असे प्रयोग झाले होते. म्हणूनच विहार व तुलसी या तलावांतून मुंबईला दररोज १५० दशलक्ष लिटर्सपेक्षा जास्त पाणीपुरवठा होतो. २५ ते ३० वर्षांपूर्वी नॅशनल पार्क येथे दहिसर नदीवर धरण बांधण्याबाबत चर्चा झाली होती.

नॅशनल पार्कमधून उगम पावणाऱ्या या नदीतील पाण्याचा पूर्वी पिण्याव्यतिरिक्त कामासाठी वापर केला जात होता. त्यामुळे येथे धरण बांधून पाणी अडवणे शक्य झाले असते, परंतु महापालिका इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेल्या धरणांसह राज्य सरकारच्या भातसा व नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलावावर अवलंबून राहिली. म्हणून आज मुंबईकर पाण्यासाठी तळमळतो आहे.

विहार, तुळशी, पवई तलावांतील पाणी सोडले जाते समुद्रात

नॅशनल पार्कमधील विहार व तुळशीत तसेच पूर्व उपनगरातील पवई तलाव पावसाळ्यात पूर्ण भरल्यानंतर हे तलाव ओसंडून वाहू लागतात. त्यामुळे लाखो लिटर पाणी मिठी नदीतून समुद्राला जाऊन मिळते. हे पाणी रोखल्यास महापालिका मुंबईकरांना दररोज १०० दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणीपुरवठा करू शकते.

Mumbai Water Crisis
Omraje Nimbalkar: सहा खासदारांच्या पक्षांतराने राजकीय हालचालींना वेग; ओमराजे निंबाळकर यांच्या मनधरणीचे प्रयत्न निष्फळ

दीडशे वर्षांत अवघ्या दोन धरणांची निर्मिती

मुंबई महानगरपालिकेने गेल्या दीडशे वर्षांच्या इतिहासात अवघ्या दोन धरणांची निर्मिती केली. यात ६५ ते ७० वर्षांपूर्वी बांधलेला मोडक सागर तलाव व गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी बांधलेल्या मध्य वैतरणा तलावाचा समावेश आहे. दोन्ही तलाव ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर बांधण्यात आले आहेत.

चितळे समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष

मुंबईतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन, जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीने वैतरणा नदीवर गारगाई व पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्प व दमणगंगा नदीवर दमणगंगा प्रकल्प राबवण्याची शिफारस केली होती. पण याकडे मुंबई महापालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले.

पालिकेने २०११ पूर्वी वैतरणा नदीवर गारगाई व पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्प व दमणगंगा नदीवर दमणगंगा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याचा पाठपुरावा न झाल्यामुळे थेंबभरही पाणी मुंबईत आले नाही.

गळती व चोरी थांबवण्यात अपयश

मुंबई शहराला दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. यातील गळती व चोरीच्या माध्यमातून १५ ते २० टक्के पाणी म्हणजे दारोज ६०० ते ८०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे मुंबईकरांना प्रत्यक्षात ३,३०० ते ३,५०० दशलक्ष लिटर पाणी मिळते.

पाण्याची गळती व चोरी थांबवण्यासाठी नवीन जलवाहिन्यांसह जलबोगद्यांची कामे सुरू असली तरी अजून किमान पाच ते सात वर्षे शंभर टक्के गळती व चोरी थांबवणे शक्य होणार नाही.

पाण्याची मागणी व पुरवठा

सध्याची पाण्याची मागणी रोज ४, ६६५ द.ल.लि.

सध्याचा पाणीपुरवठा रोज ४, १०० द.ल.लि.

प्रत्यक्ष मिळणारे पाणी रोज ३,३०० ते ३,५०० द.ल.लि

गळती व चोरी रोज ६०० ते ८०० द.ल.लि.

२०४१ मधील मागणी रोज ६, ४२४ द.ल.लि.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news