मुंबई: देशभरात रविवारी नीट यूजी २०२६ फेरपरीक्षा होत असून त्यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती शनिवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या सूत्रांनी दिली.२२.७९ लाख उमेदवार नीटसाठी सज्ज झाले आहेत. यात महाराष्ट्रातील ३५ केंद्रांवर २ लाख २० हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही परीक्षा पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याचे एनटीएच्या सूत्रांनी स्पष्ट केले. यापूर्वी नीटचे पेपर फुटले होते आणि त्यावरून मोठा गदारोळ माजला होता. त्यामुळे ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार आहे.
थेट अबुधाबी परीक्षा केंद्र
नीट यूजी २०२६ फेरपरीक्षेसाठी नागपूरमधील एका विद्यार्थ्याला अबुधाबी येथे परीक्षा केंद्र आल्यानंतर पुन्हा एकदा या प्रक्रियेतील भोंगळपणा समोर आला. यावर एनटीएने शनिवारी अधिकृत स्पष्टीकरण दिले. संबंधित विद्यार्थ्याने स्वतःच्या लॉगिनवरूनच ‘अबुधाबी’ परीक्षा केंद्राची निवड केली होती. तरीही ‘विद्यार्थी प्रथम’ धोरण राखून ऐनवेळी त्याचे केंद्र बदलून देण्यात आल्याचे एनटीएने स्पष्ट केले.
राहुल गांधींची टीका
अबुधाबी केंद्रावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी एटीए आणि केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. संबंधित विद्यार्थ्यास स्वतःच्या शहरात परीक्षा केंद्र न मिळणे आणि परदेशात पाठवणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या संयमाची परीक्षा घेण्यासारखे असल्याचे ते म्हणाले.