पवन होन्याळकर
मुंबई: नीट-यूजीचा निकाल जाहीर होताच राज्यातील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएससह विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांतील हजारो जागांसाठी यंदा १ लाख ७ हजार ३०४ पात्र विद्यार्थ्यांमध्ये अटीतटीची स्पर्धा होणार आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत पात्र विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असली, तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी स्पर्धा कायम तीव्र राहणार आहे. गुणवत्तेत बदल , वाढलेल्या वैद्यकीय जागा, ऑल इंडिया रँक आणि समुपदेशनातील पसंतीक्रम यामुळे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत प्रत्येक गुण निर्णायक ठरणार आहे.
राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) जाहीर केलेल्या निकालानुसार, महाराष्ट्रातून यंदा २ लाख २२ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी नीट-यूजीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख १ हजार १०० विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले, तर १ लाख ७ हजार ३०४ विद्यार्थी पात्र ठरले.
गेल्या वर्षी २ लाख ४८ हजार २०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ४२ हजार ८५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि १ लाख २५ हजार ७२७ विद्यार्थी पात्र ठरले होते. पात्र विद्यार्थ्यांची संख्या तब्बल १८ हजार ४२३ ने घटली आहे.
देशातील ६९० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेल्या १३८ गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची पहिली पसंती यंदाही शासकीय एमबीबीएस महाविद्यालयांनाच राहण्याची शक्यता आहे.
मुंबईतील जीएस मेडिकल कॉलेज (केईएम), टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज (सायन), नायर हॉस्पिटल मेडिकल कॉलेज, ग्रँट मेडिकल कॉलेज, पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेज तसेच नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मिरज, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, लातूर आणि इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील जागांसाठी यंदाही मोठी स्पर्धा अपेक्षित आहे.
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस प्रवेशाचा शेवटचा खुल्या प्रवर्गातील कट-ऑफ सुमारे ५३८ ते ५३९ गुणांपर्यंत राहू शकतो, असा अंदाज एपीएमएच्या संचालक डॉ. हिमानी तपस्वी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, राज्यातील सरकारी एमबीबीएसच्या जागांसाठी साधारण ४७ हजार ऑल इंडिया रँकपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि पुण्यातील अग्रगण्य सरकारी महाविद्यालयांसाठी ६०० हून अधिक गुणांची आवश्यकता भासू शकते, तर एम्ससारख्या राष्ट्रीय संस्थांमध्ये प्रवेशासाठी ६५५ ते ६६० किंवा त्याहून अधिक गुण आवश्यक राहतील, असेही त्यांनी नमूद केले. एमबीबीएसच्या जागा भरल्यानंतर विद्यार्थ्यांचा कल बीडीएस, बीएएमएस, होमिओपॅथी, फिजिओथेरपी आणि पशुवैद्यकीय अभ्यासक्रमांकडे वळेल, असेही त्यांनी सांगितले.