मुंबई : मुंबई महानगरपालिका मुख्यालय 2002 पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष कार्यालय आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटी मुळे मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तीन तर शरद पवार गटाचा अवघा एक नगरसेवक आल्यामुळे हातात त्यांना मुंबई महापालिका मुख्यालयातील कार्यालय गमवावे लागणार आहे. समाजवादी पार्टीलाही कार्यालय मिळणार नाही.
मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या नगरसेवकांच्या संख्येनुसार कार्यालय उपलब्ध करून दिले जाते. महापालिकेत सर्वाधिक मोठे कार्यालय भाजपा व शिवसेनेकडे आहे. तर अन्य पक्षांना छोटी छोटी कार्यालय देण्यात आली आहेत. किमान पाच ते सहा नगरसेवक यांचा एक गट बनत असल्यामुळे त्यांना कार्यालय देण्यात येते. परंतु मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अवगे तीन नगरसेवक निवडून आले असून शरद पवार गटाचा अवघा एकमेव नगरसेवक निवडून आला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाला महापालिकेत नियमानुसार कार्यालय मिळू शकणार नाही.
समाजवादी पार्टीचेही मागच्या वेळी सहा नगरसेवक होते. म्हणून त्यांना कार्यालय मिळाले होते. मात्र आता त्यांचे दोन नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांनाही कार्यालय गमवावे लागणार आहे. महापालिका स्थापन झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी व समाजवादी पार्टी एकत्र आल्यास महापालिका मुख्यालयात त्यांना एक छोटे कार्यालय मिळू शकते. पण यासाठी त्यांना आपला एक गट तयार करावा लागणार आहे. त्या गटाची नोंदणी झाल्यानंतर महापालिका सचिव विभाग त्यांना कार्यालय उपलब्ध करून देऊ शकते. परंतु सध्या तरी त्यांना कोणतेही कार्यालय मिळणार नाही.
ठाकरे सेनेच्या कार्यालयाचा आकार घटणार
शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांची संख्या 2017 च्या तुलनेत कमी झाल्यामुळे त्यांना दिलेल्या मोठ्या कार्यालयाचा आकार कमी होण्याची शक्यता आहे. सध्या त्यांच्याकडे भाजपा एवढेच कार्यालय आहे.
शिवसेना व मनसेला कार्यालय मिळणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महापालिका मुख्यालयात पक्ष कार्यालय मिळणार आहे. यात शिवसेनेला मोठे कार्यालय तर मनसेला छोटे कार्यालय मिळणार आहे. त्याशिवाय एमआयएमलाही पक्ष कार्यालय उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.