राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची अंतिमयादीमध्ये ते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेयांच्या नावांचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  Pudhari
मुंबई

NCP National Executive List | राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून तटकरे, पटेल यांना वगळले!

पार्थ आणि जय पवारांची वर्णी; तांत्रिक चुकीचे सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

NCP National Executive List

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची अंतिम यादी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या यादीमध्ये पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे-पाटील यांच्या नावांचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, या सर्व प्रकारावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण दिले असून ही एक 'तांत्रिक चूक' असल्याचे म्हटले आहे।

कार्यकारिणीतील प्रमुख बदल

व्हायरल झालेल्या यादीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठी खांदेपालट पाहायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने पवार कुटुंबातील पुढच्या पिढीला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्याचे दिसत आहे. सुनेत्रा पवार: पत्रात त्यांचा उल्लेख 'राष्ट्रीय अध्यक्ष' म्हणून करण्यात आला आहे. पार्थ पवार यांची 'जनरल सेक्रेटरी' (महासचिव) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर जय पवार यांना 'नॅशनल सेक्रेटरी' (राष्ट्रीय सचिव) म्हणून स्थान देण्यात आले आहे.

तटकरे, पटेलांना वगळले? वादाची शक्यता

निवडणूक आयोगाला सादर केल्याचे सांगण्यात येणाऱ्या या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची नावे गायब आहेत. यापूर्वी सुनील तटकरे यांच्यावर महासचिव पदाची जबाबदारी होती, मात्र नव्या यादीत त्यांचे नाव नसल्याने पक्षात अंतर्गत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.'

ती यादी अधिकृत नाही, तांत्रिक चूक झाली : सुनेत्रा पवार

यादी व्हायरल झाल्यानंतर आणि माध्यमांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी तातडीने 'X' पोस्टच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची एक यादी सध्या प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे. मात्र, त्या यादीमध्ये काही तांत्रिक चुका झाल्या आहेत. या चुका लवकरच दुरुस्त करून पक्षाची अधिकृत आणि सुधारित यादी जाहीर करण्यात येईल," असे सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

निवडणूक आयोगाला दिलेले पत्र चर्चेत

सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीने २९ तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवण्यात आले होते. या पत्राच्या आधारेच ही यादी चर्चेत आली होती. मात्र, आता स्वतः अध्यक्षांनीच यात त्रुटी असल्याचे मान्य केल्यामुळे, सुधारित यादीत कोणत्या नेत्यांना स्थान मिळते आणि कुणाचा पत्ता कट होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT