Maharashtra Politics Pudhari
मुंबई

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडी वाढल्या; पार्थ पवार मुख्यमंत्र्याच्या भेटीला, तर नाराज पटेल, तटकरे थेट सिल्व्हर ओकवर

राष्ट्रवादीतील संघर्ष शिगेला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. खासदार पार्थ पवार यांनी पक्षावर आपली पकड घट्ट करण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना डावलण्यास सुरुवात केल्याने हा संघर्ष पेटला आहे.

या पार्श्वभूमीवर पटेल आणि सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची 12 मे रोजी सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट घेत पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी केल्याचे समजते. मात्र, पवारांनी दोघांचे म्हणणे ऐकून घेतले असले, तरी त्यावर कोणतेही भाष्य केले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पाठविलेल्या ताज्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा कार्याध्यक्ष, तर सुनील तटकरे यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख केलेला नाही. हा उल्लेख मुद्दाम टाळण्यात आल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीत पार्थ पवार विरुद्ध प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे असा वाद सुरू आहे. हा कलह वाढला, तर पक्षफुटीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली. पवारांनी पटेल यांना भेटीसाठी वेळ दिली; मात्र सुनील तटकरे सिल्व्हर ओकवर भेटीसाठी येणार याची त्यांना कल्पना नव्हती. 12 मे रोजी रात्री आठ वाजता अचानक तटकरे सिल्व्हर ओकवर हजर झाले. तटकरेंच्या आधीच प्रफुल्ल पटेल सिल्व्हर ओकवर पोहोचले होते.

20 मिनिटे चर्चा

सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्यात सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत सुनील तटकरे काहीच बोलले नाहीत. प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्यामध्येच चर्चा झाली. या भेटीत पटेल यांनी शरद पवार यांच्यासमोर पार्थ पवार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पार्थ पवार मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. पक्षात कोणालाही विश्वासात घेत नसल्याचे पवारांना सांगितले. पवारांनी पटेलांचे म्हणणे फक्त ऐकून घेतले; पण त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

खासदार पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राष्ट्रवादीतील घडामोडीची माहिती दिली. पक्षात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नाराजीने धुसफूस सुरू आहे. या नाराजीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पार्थ पवार यांनी आपली भेट घेतल्याचे सांगितले. या भेटीत राजकीय आणि प्रशासकीय विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले.

परांजपे यांनी घेतली शरद पवारांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि ठाणे शहर जिल्हाप्रमुख आनंद परांजपे यांनी गुरुवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आनंद परांजपे यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले.

परांजपे म्हणाले की, शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मी प्रवेश केला. मी शरद पवार यांना भेटणार आहे, हे एकनाथ शिंदेंनाही सांगितले आहे. शरद पवार यांची सदिच्छा भेट मी जवळपास तीन वर्षांनंतर घेतली. या भेटीत त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला, असे आनंद परांजपेंनी सांगितले.

वादाला ‌‘ती‌’ क्लिप कारणीभूत?

राष्ट्रवादीत सुरू असलेल्या या वादाला दिल्लीत रेकॉर्ड करण्यात आलेली एक ऑडिओ क्लिप कारणीभूत असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने अजित पवार यांच्याविषयी केलेले वक्तव्य दुसऱ्या एका नेत्याने रेकॉर्ड केले होते. त्याची क्लिप अजित पवार यांना ऐकवण्यात आली होती. आता ती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनाही ऐकवण्यात आली आहे. या आक्षेपार्ह क्लिपमुळे राष्ट्रवादीत ही धुसफूस सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT