मुंबई : नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांत उडालेला धुव्वा विचारात घेऊन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचा गण आणि पंचायत समितीच्या गटात परस्परांविरोधात न लढता, दोन्हीपैकी एका राष्ट्रवादीकडून एकच उमेदवार दिला जाणार आहे.
पुणे जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही घड्याळ आणि तुतारी वाजविणारा माणूस या दोन्ही चिन्हांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढवतील, अशा हालचाली सध्या जोर धरत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत सत्तेचा दावा करणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येऊनही यश मिळाले नाही. त्यामुळे राज्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये अशाच प्रकारचा पराभव टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांनी आपापल्या सोयीनुसार स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस रवींद्र पवार म्हणाले, या निवडणुकांमध्ये एका गणात किंवा गटात ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी वाजविणारा माणूस’ ही दोन्ही निवडणूक चिन्हे एकमेकांविरोधात लढणार नाहीत. ज्या मतदारसंघात जे चिन्ह फायदेशीर ठरेल, त्या चिन्हावर उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेण्याचे आदेश पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना देण्यात आले आहेत. यामध्ये राज्य पातळीवरून कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही.
महापालिका निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची संयुक्त बैठक झाली असून, त्यात ही रणनीती निश्चित करण्यात आली आहे. आमच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीसुद्धा अशाप्रकारच्या उमेदवार निवडीला हिरवा कंदील दाखविला आहे, असे रवींद्र पवार यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन्ही निवडणुकांमधील मतांची टक्केवारी आणि अपयश लक्षात घेऊन अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनेही एक गण किंवा गटात एकच उमेदवार निवडीला प्राधान्य दिल्याचे कळते.