मुंबई : राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद - पंचायत समित्यांच्या निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरे जाण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे. त्यादृष्टीने आता भाजपाच्या निर्णयाकडे राष्ट्रवादीचे लक्ष लागले आहे. मंत्रालयासमोरील महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा हाच सूर होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे बैठकीनंतर म्हणाले, महायुतीबाबत ठिकठिकाणी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहोत. त्यामुळे सर्व निवडणुकांना महायुती म्हणून सामोरे जाण्याचे धोरण ठरवले जाईल.
राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे. राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनाही याची माहिती दिली जाईल. त्यानंतर आमची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक अपेक्षित आहे. ती बैठक झाली तर राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांना महायुती म्हणून सामोरे जायचे धोरण ठरवले जाईल.
प्रत्येक महानगरपालिकानिहाय राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे. ज्या ठिकाणी सत्ता आहे ते अधिक संख्याबळ मागणे हे स्वाभाविक आहे. महायुती म्हणून चर्चेच्या अनेक फेरी घडवाव्या लागत असतात, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अशावेळी त्या - त्या जिल्ह्यासाठी नेमलेले समन्वयक, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्यासमवेत शुक्रवारी माविमच्या सभागृहात आढावा बैठक घेतली.
नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पिंपरी - चिंचवड, पुणे, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई- ठाणे विभागातील कल्याण डोंबिवली, ठाणे शहर, मिरा-भाईंदर, वसई-विरार या महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत महायुती म्हणून सामोरे जाताना कोणती पावले उचलली गेली पाहिजेत व त्या- त्या महानगरपालिकेत मित्रपक्षांशी चर्चा झाली असेल याबाबतचा अहवाल घेतला, अशी माहितीही त्यांनी दिली.