पुणे / मुंबई: 'एनसीईआरटी'च्या इतिहास पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या निर्णयाविरोधात छत्रपती फाऊंडेशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संस्थेने केंद्र सरकार आणि एनसीईआरटीकडे हा नकाशा तत्काळ पुनर्संस्थापित करावा. अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा फाऊंडेशनचे अध्यक्ष ओंकार डोंबे आणि सचिव अॅड के. डी. जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला.
डोंबे म्हणाले की, मराठा साम्राज्य ही केवळ प्रादेशिक सत्ता नसून ती भारताच्या राजकीय इतिहासाला दिशा देणारी राष्ट्रीय शक्ती होती. यासंदर्भात संस्थेने पेशवा दफ्तरातील पत्रे, राजपुताना गॅझेट आणि ब्रिटिश काळातील नकाशांचे ठोस ऐतिहासिक पुरावे सादर केले आहेत.
विधानसभेत राज्य सरकारने हा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्याचे आश्वासन देऊनही आता इंग्रजी पाठ्यपुस्तकातूनही तो हटविण्यात आला आहे. सर्व पाठ्यपुस्तकांत मराठा साम्राज्याचा नकाशा तत्काळ पुन्हा समाविष्ट करावा. या शैक्षणिक बदलापूर्वी तज्ज्ञ इतिहासकारांशी सल्लामसलत केली जावी, असेही डोंबे यांनी सांगितले.
याचिका दाखल करणार मराठा
साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या प्रकारासंदर्भात लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून ऐतिहासिक सत्य जपण्यासाठी जनजगृती मोहीम आणि सभांचे आयोजन केले जाणार आहे. त्याचबरोबर राज्य आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती छत्रपती फाऊंडेशनचे सचिव अॅड. के. डी. जाधव यांनी यावेळी दिली.