मुंबई : मुंबई आणि पाऊस हे तसे बेभरवशाचे समीकरण मानले जाते. आता मात्र मुंबईत कोसळणाऱ्या पावसावर पैसा गुंतवण्याची संधी नॅशनल कमॉडिटी ॲण्ड डेरेव्हिटिज एक्स्चेंजने अर्थात एनसीडीईएक्सने प्रथमच मुंबईकरांसाठी निर्माण केली आहे.
नावीन्यपूर्ण सेवांद्वारे नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित करणाऱ्या एनसीडीईएक्सने भारतातील पहिल्या व्यापार विनिमयात हवामानावर पैसे गुंतवणुकीची ही संधी म्हणजे मुंबईत पडणाऱ्या पावसावर गुंतवणूक करता येईल. त्यासाठी ‘रेनमुंबई’हे देशातील पहिले एक्स्चेंज ट्रेड सुरू करण्याची घोषणा एनसीडीईएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरुण रास्ते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख विक्रम सिंह, हवामान तज्ज्ञ डॉ. सुषमा नायर, मुंबई आयआयटीचे सहायक प्राध्यापक डॉ. पीयूष पांडे आदी उपस्थित होते.
धो धो कोसळणाऱ्या पावसाने अनेकदा आर्थिक संकटही कोसळते. अशा काळात याच पावसावर गुंतवणूक करून पैसा कमवण्याची ही नवी संधी असल्याचा दावा एनसीडीईएक्सने केला.
भारताचे सारे अर्थकारण मान्सूनवर विसंबून आहे आणि हाच मान्सून कधी साथ देतो तर कधी दगा. मान्सूनच्या लहरीपणाचा फटका उद्योग क्षेत्राला बसतो. टॅक्सी ड्रायव्हर, वीज पुरवठादार, शेतकरी अशा उद्योगशील लोकांचे आर्थिक नुकसान पावसाच्या लहरीपणाने होते. मात्र यापुढे कोणताही पावसाळा चार महिन्यांची गुंतवणुकीची संधी रेनमुंबई या एक्स्चेंज ट्रेडच्या माध्यमातून घेऊन येईल.
रेनमुंबई एक्स्चेंज ट्रेडने आधी सेबीशी करार केला. त्याबरोबर मुंबई हवामान विभागालाही करारबद्ध केले, असे एनसीडीईएक्सचे सीईओ डॉ. अरुण रास्ते यांनी सांगितले. रेनमुंबई एक्स्चेंज ट्रेडसाठी विश्वसनीय आणि प्रामाणिक पर्जन्यमानाची माहिती मुंबई हवामान खाते देईल. कुलाबा आणि सांताक्रूझ स्टेशनवर जमिनीवर मोजली जाणारी पावसाची आकडेवारी यासाठी पुरवली जाईल.विज्ञान आणि वित्त यांच्या नियमबद्ध कराराने ही नवी बाजारपेठ निर्माण झाल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख विक्रम सिंह यांनी सांगितले.
अशी कराल मुंबईच्या पावसावर गुंतवणूक
येरे येरे पावसा, तुला देतो पैसा हे गाणे मुंबईपुरते इतिहासजमा होणार असून, येणारा पाऊसच कदाचित तुम्हाला पैसा देऊन जाऊ शकतो. मुंबईच्या पावसावर विश्वास किती ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न... मात्र, प्रत्येक गुंतवणुकीत व्यक्तीगत अंदाज आणि खात्री इथेही काम करू शकेल. मुंबईत साधारणत: 10 जूनला मान्सूनचे आगमन होईल. त्याआधीच रेनमुंबई ट्रेडिंग एनसीडीईएक्सने सुरू केलेले असेल. हे ट्रेडिंग कसे होणार याची एनसीडीईएक्सने बुधवारच्या पत्रकार परिषदेत दिलेली ही महिती.
मुंबईतील पावसावर पैसे गुंतवणारे हे भविष्यकालीन वायदे करार असून रेनमुंबई या टिकर चिन्हाखाली या संबंधीचे व्यवहार करता येतील. या वायद्यांच्या एका लॉटचे मूल्य सुमारे 1.10 लाख रुपयांच्या घरात आहे. कमाल 50 लॉट खरेदी करता येऊ शकतील.
गुंतवणूकदाराला किमान लॉट साईजच्या 10 टक्क्यांपर्यंत म्हणजेच दहा ते बारा हजार मार्जिन राखावे लागेल.
शिवाय पर्जन्यमानावर आधारित हे करार असल्याने बरसणाऱ्या पावसाच्या 1 मिमीमागे 50 रुपये वाढतील अथवा घटतील.
वायदे बाजारात सोमवार ते शुक्रवार सकाळी 10.00 ते रात्री 11.30/11.55 दरम्यान हे व्यवहार सुरू राहणार असून सध्या जून ते सप्टेंबर असे चार महिन्यांचे वायदे करार उपलब्ध असतील, अशी माहिती या पत्रकार परिषदेत एनसीडीईएक्सने दिली.
भारतीय हवामान विभागाच्या वेधशाळांकडून प्राप्त होणाऱ्या दैनंदिन पर्जन्यमानाची माहिती वापरात आणली जाईल.
30 वर्षांच्या माहिती आधारित हे करार आकाराला येतील, असेही एनसीडीईएक्सकडून स्पष्ट करण्यात आले.
रेनमुंबई एक्ससेंज ट्रेड हे फक्त मुंबईसाठी प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईच्या सहकार्याने हा ट्रेड चालेल.
ही गुंतवणूक येत्या 1 जून 2026 पासून सप्टेंबर 2026 असे फक्त चार महिनेच खुली असेल.
मुंबई हवामान विभागाच्या दररोजच्या पर्जन्यमानाच्या नोंदीवरून ट्रेडिंग केले जाईल.