मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणात महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच अडचणीत सापडलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
मलिक व इतरांविरुद्ध सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ‘ईडी’ने दाखल केलेल्या मनी लाँडरिंगच्या खटल्यांतर्गत विशेष न्यायालयाच्या कार्यवाहीला न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या एकलपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. विशेष एमपीएमएलए न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये मलिक व इतर तिघांविरुद्ध आरोप निश्चित केले होते.
त्यामुळे मनी लाँडरिंगच्या खटल्याचा मार्ग मोकळा झाल्याने मलिक यांची चिंता वाढली होती. या पार्श्वभूमीवर मलिक यांनी विशेष न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
विशेष न्यायालयाच्या त्या आदेशाला अंतरिम स्थगिती देत न्यायमूर्ती चांडक यांच्या एकलपीठाने, कागदपत्रांची यादी सादर करण्यासाठी पुढील सुनावणी 23 जानेवारीला निश्चित केली आहे.