Nawab Malik pudhari photo
मुंबई

Nawab Malik case : नवाब मलिकांवर आरोप निश्चित

दाऊदसंबंधित मनी लाँडरिंग

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना विशेष ‌‘एमपीएमएलए‌’ न्यायालयाने झटका दिला आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात अखेर नवाब मलिक यांच्यासह अन्य आरोपींविरोधात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत विशेष ‌‘एमपीएमएलए‌’ न्यायालयाचे विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी मंगळवारी आरोप निश्चित केले. मात्र, मलिक यांनी या आरोपांचा इन्कार केला. त्यामुळे या खटल्याची पुढील सुनावणी 19 डिसेंबरला होणार आहे.

नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिम कासकरच्या डी-कंपनीसोबत कट रचून अनेक भूखंड असलेल्या कुर्ल्यातील मालमत्ता लाटल्याचे आरोप भाजपने केले होते. यानंतर ‌‘ईडी‌’ने मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून नंतर आरोपपत्र दाखल केले. दरम्यान, नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मेसर्स मलिक इन्फ्रास्ट्रक्चरने दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. तो विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी गेल्याच आठवड्यात फेटाळून लावत मंगळवारी (दि. 18) न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मलिक यांच्यासह अन्य आरोपी न्यायालयात हजर होते.

याप्रकरणी ‌‘ईडी‌’ने नवाब मलिक यांना 2022 मध्ये अटक केली होती. त्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये वैद्यकीय कारणास्तव ते जामिनावर बाहेर आहेत. दाऊदची बहीण हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 च्या मुंबई स्फोटाचा आरोपी सरदार खान व नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाऊंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बळकावल्याचा आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT