मुंबई: रविवार दिनांक ११ ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत असून घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर महामुंबई प्रदेशातील श्री देवी मंदिरांमध्ये नवरात्रौत्सवाची तयारी पूर्ण झाली. आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि भाविकांसाठी विविध सोयीसुविधांनी मंदिर परिसर सज्ज झाले आहेत.
रविवारी सकाळी साडेसात ते साडेदहा या वेळेत घटस्थापना होईल. त्यानंतर भक्ती, परंपरा आणि उत्साहाच्या वातावरणात नवरात्रौत्सवाला आजपासून प्रारंभ होईल. यंदा नवरात्रौत्सवा दहा दिवसांचा असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन त्यानुसार करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमध्ये नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी असून देशभरातून लाखो भाविक शक्तिपीठांच्या दर्शनासाठी कोल्हापूर, तुळजापूर, सप्तश्रृंगीचे वणी आणि माहूरमध्ये दाखल होतात. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शन व्यवस्था अधिक सुलभ करण्यावर भर देण्यात आला आहे.
नवरात्रौत्सवाच्या दहा दिवसांत भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा, मेटल डिटेक्टर, बॅग स्कॅनर आणि अन्य सुरक्षा उपकरणांचा वापर करण्यात येणार आहे.
गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस, देवस्थान समितीचे कर्मचारी आणि स्वयंसेवक तैनात राहणार आहेत. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी दर्शनरांगा आणि परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.