Navi Mumbai Water Supply Pudhari
मुंबई

Navi Mumbai Water Supply: नवी मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! दोन दिवस पाणीपुरवठा १६ तास बंद

भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोरबे मुख्य जलवाहिनीवर तांत्रिक कामे; ६ ऑक्टोबर सकाळी १० ते ७ ऑक्टोबर पहाटे २ पर्यंत पाणीबंद

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेमार्फत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र तसेच मोरबे मुख्य जलवाहिनीवर विविध महत्त्वाची तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजेपर्यंत तब्बल १६ तास मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील १३.५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या संपचॅनेलवरील एम.एस. प्लेट बसविणे, नवीन मोटरींग किऑस्क बसविणे, तसेच केंद्राजवळील मोरबे मुख्य जलवाहिनीवर २०५० मि.मी. व्यासाचा जलमापक (फ्लो मीटर) बसविण्याचे काम करण्यात येणार आहे.

याशिवाय सीबीडी सेक्टर-७ येथे मोरबे मुख्य जलवाहिनीवर १८०० मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह, वाशीतील अरेंजा सर्कलजवळ ७०० मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह आणि महापे येथे ९०० मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या जल विभागाकडून करण्यात येणाऱ्या या कामांमुळे बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे-जुईनगर-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोडमधील पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार आहे.

बुधवारी कमी दाबाने होणार पाणीपुरवठा

पाणीपुरवठा बंद राहिल्यानंतर बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी सकाळच्या तसेच सायंकाळच्या वेळेतील पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे.

नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करून आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि पाणीपुरवठा विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT