नवी मुंबई: कोरोनानंतरच्या काळात आर्थिक परिस्थिती काही प्रमाणात ढासळलेली असली तरी वैयक्तिक सोयीसाठी स्वतःचे वाहन घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. सार्वजनिक वाहतुकीतील गर्दी टाळण्याची मानसिकता व जीवनशैलीतील बदल यामुळे वाहन खरेदीत वाढ झाली असून, त्याचबरोबर वाहनांसाठी आकर्षक व प्रतिष्ठेचे मानले जाणारे व्हीआयपी (फॅन्सी) नंबर घेण्याची क्रेझही वाढताना दिसत आहे.
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत तब्बल 7,129 वाहनधारकांनी व्हीआयपी नंबर घेतले असून, यामधून आरटीओला 11 कोटी 21 लाख 23 हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे या विभागाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.
व्हीआयपी नंबरसाठी शासनाकडून जादा शुल्क आकारले जात असले, तरीही नागरिकांचा या नंबरांकडे असलेला ओढा कमी झालेला नाही. उलट, ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून व्हीआयपी नंबरकडे पाहिले जात असल्याने मागणी सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे, ऑनलाइन लिलाव पद्धतीमुळे नंबर मिळवण्याची प्रक्रिया सुलभ झाली असून, इच्छुक वाहनधारक मोठ्या रकमा मोजण्यासही तयार आहेत.
नंबर निवडताना अनेक वाहनधारक अंकशास्त्राचा आधार घेत असल्याचे दिसते. अंकांची बेरीज करून येणारा ‘लकी नंबर’, जन्मतारीख, वाढदिवस, किंवा कुटुंबातील महत्त्वाच्या तारखा यांचा विचार करून नंबर घेतले जातात. काही जण आधीच्या वाहनाचा नंबर शुभ ठरल्याने तोच नंबर नव्या वाहनासाठी पुन्हा घेण्याचा प्रयत्न करतात.
त्यामुळे विशिष्ट नंबरसाठी स्पर्धा निर्माण होत असून, लिलावात त्यांची किंमतही मोठ्या प्रमाणात वाढते. वाहन खरेदीसोबतच व्हीआयपी नंबर घेण्याची वाढती आवड ही नवी मुंबईकरांच्या बदलत्या जीवनशैलीचे आणि आर्थिक प्राधान्यांचे प्रतीक मानली जात आहे. भविष्यात ही क्रेझ आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
व्हीआयपी नंबरची किंमत
1 नंबर (चारचाकी 4 लाख, दुचाकी 50 हजार), 9, 99, 786, 999, 9999(चारचाकी 1.50 लाख, दुचाकी : 20 हजार),2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88(चारचाकी 50 हजार,दुचाकी 10 हजार)
‘हौसेला मोल नसते, या उक्तीप्रमाणे नागरिक व्हीआयपी नंबरसाठी मोठ्या रकमा खर्च करत आहेत. यामुळे शासनाच्या महसुलात भर पडत आहे. अनेक व्यावसायिक, उद्योजक व तरुण वर्गात देखील आकर्षक नंबर घेण्याची स्पर्धा दिसून येते. सोशल मीडियावरही अशा नंबरांची प्रसिद्धी होत असल्याने त्याचे आकर्षण अधिक वाढले आहे.-गजानन गावंडे, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई