Expired Food Products Racket Pudhari
मुंबई

Expired Food Products Racket: तुर्भेत मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री; 'एफडीए'कडून पर्दाफाश

७५ लाखांचा मुदतबाह्य साठा जप्त

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगवरील एक्सपायरी डेट बदलून ते पुन्हा बाजारात विकणारे एक मोठे रॅकेट नवी मुंबईतील तुर्भे येथे उघडकीस आले आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत ७५ लाखांहून अधिक किमतीचा मुदतबाह्य साठा जप्त केला असून, याप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आस्थापनाचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या माहितीच्या आधारे, तुर्भे येथील टीटीसी इंडस्ट्रियल एरियामधील प्लॉट नंबर सी-४४९ वर असलेल्या 'साधना एंटरप्रायझेस' या आस्थापनेवर संयुक्त पथकाने छापा टाकला.

जयप्रकाश संचूरीराम सिंग आणि जया नवरंग बहादूर सिंग यांच्या मालकीच्या या गोदामात नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार केले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

यामध्ये प्रामुख्याने अन्नपदार्थांच्या मूळ पॅकेजिंगवरील उत्पादन दिनांक तसेच मुदतबाह्य अथवा वापरण्याच्या अंतिम दिनांकाची माहिती पुसून त्यावर नवीन दिनांक छापला जात होता. त्यानंतर हे पदार्थ पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे आढळले.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली तसेच सहआयुक्त (अन्न), ठाणे सचिन जाधव यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त (अन्न) अजित मैत्रे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत पवार, विक्रम निकम, सोनाली पवार, अभिनंदन रणदिवे, जोत्स्ना जाधव, वर्षा आडे, सुमीत डफडे, उत्कर्ष मोरे आणि संदीप दोलताडे यांच्या पथकाने कारवाई केली. नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारीही या कारवाईत सहभागी झाले.

निर्यातदार कंपन्यांशी संबंधित साठा

कारवाईत आर्णिका एक्स्पोर्ट (नोएडा), नोव्हास एक्स्पोर्ट (मुलुंड), जोशी ब्रदर्स (घाटकोपर), बियॉन्ड एक्स्पोर्ट (मालाड), जमनादास रुटन्सी अँड कंपनी (फोर्ट), स्पॅन इम्पेक्स, कस्तुरी (अंधेरी), अंगद एक्स्पोर्ट (चेंबूर), भारत इंटरनॅशनल (दिल्ली) आणि अनिका एक्स्पोर्ट (नवी दिल्ली) या कंपन्यांशी संबंधित अन्नसाठा आढळून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT