नवी मुंबई परिसरातून मन सुन्न करणारी आणि शिक्षणव्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. गोठीवली गावातील रहिवासी पूनम वडके यांची मुलगी घरगुती शिकवणीला (ट्युशन) जात होती. रोजप्रमाणेच ती शिकवणीसाठी गेली असताना, ट्युशन टीचरने सर्व विद्यार्थ्यांना पाढे पाठ करण्यास सांगितले होते. मात्र संबंधित आठवीतील विद्यार्थिनीने पाढे पाठ न केल्यामुळे ट्युशन टीचरने संतापाच्या भरात तिला उलथन्याने ४० फटके मारल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्युशन टीचरने चपाती उलटण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उलथन्याने या चिमुकल्या विद्यार्थिनीच्या हातावर तब्बल ४० फटके मारले. हे फटके इतके जोरात होते की विद्यार्थिनीच्या हाताला मोठ्या प्रमाणात सूज आली असून लाल चट्टे उमटले आहेत. तिच्या हातावर गंभीर जखमा झाल्या असून तिला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिक्षण देण्याच्या नावाखाली मुलांवर होणाऱ्या हिंसाचाराचा हा प्रकार समाजाला हादरवून टाकणारा आहे.
घटनेनंतर विद्यार्थिनी घरी परतल्यावर तिने संपूर्ण प्रकार आपल्या आईला, पूनम वडके यांना सांगितला. त्यांनी तात्काळ ट्युशन टीचरला जाब विचारण्यासाठी संपर्क केला असता, संबंधित शिक्षकाने अत्यंत उद्धट आणि अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. “तुमची मुलगी अभ्यास करत नाही. इतर मुलांनाही फटके दिले आहेत. जर त्रास होत असेल तर तिला दुसऱ्या ट्युशनला पाठवा,” अशा स्वरूपाचे उत्तर देत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आईने सांगितले.
या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे. शिक्षण हे मुलांच्या आयुष्याचा पाया असतो. मात्र शिक्षणाच्या नावाखाली शारीरिक शिक्षा देणे अशा घटनांमुळे मुलांमध्ये भीती, मानसिक दडपण, न्यूनगंड आणि शिक्षणाविषयी नकारात्मक भावना निर्माण होतात. त्यामुळे ही केवळ एका मुलीची नाही, तर संपूर्ण समाजाची गंभीर समस्या असल्याचे स्पष्ट होत आहे.
या प्रकरणी पूनम वडके यांनी तात्काळ कायदेशीर पाऊल उचलत रबाळे पोलीस ठाणे येथे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची नोंद घेण्यात आली असून चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित ट्युशन टीचरविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून जोर धरू लागली आहे.