Navi Mumbai Political Row Pudhari
मुंबई

Navi Mumbai Political Row: एकनाथ शिंदेंना डावलले शिवसैनिक आक्रमक; गणेश नाईकांना दाखवले काळे झेंडे

पालिका आयुक्त, सचिव दालनाचा घेतला ताबा

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका निवडणुकीत वनमंत्री गणेश नाईक व एकनाथ शिंदे यांच्‍यात पेटलेला राजकीय वाद अजूनही शमलेला नाही. सोमवारी महापालिकेने आरोग्‍य सुविधांचे लोकार्पण नाईक यांच्‍या हस्‍ते केले. मात्र उपमुख्‍यमंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेतून वगळले.

हे दुसर्‍यांदा घडल्‍याने नवी मुंबईतील शिवसैनिक आक्रमक झाले. त्‍यांनी वाशी पालिका रुग्‍णालयाबाहेर नाईकांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करीत जोरदार घोषणाबाजी केली. त्‍यानंतर पालिका मुख्‍यालयात आ‍युक्‍त आणि सचिवांच्‍या दालनाचा ताबा घेत तेथे ठिय्‍या मारला.

यावर गणेश नाईक यांनी हा पालिकेचा कार्यक्रम असल्याचे सांगून मला काळे झेंडे दाखवण्याचा काही संबंध नाही. भविष्यकाळात कोण कुठे असेल हे तुम्हाला दिसेल, असा टोला लगावला आहे. तर महापौरांनी शासनाच्या राजशिष्टाचारानुसारच निमंत्रण पत्रिका छापल्‍याचा दावा केला आहे.

कार्यक्रम पत्रिकेवर खासदार नरेश म्हस्के

आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव आहे. मात्र, पालकमंत्री यांना डावलण्‍यात आले. यापूर्वी उड्डाणपुलाच्‍या कार्यक्रमावेळीही हाच प्रकार घडला होता. याची धग शिवसैनिकांच्‍या मनात होती. त्‍यामुळे संतप्‍त झालेल्‍या शिवसैनिकांनी वाशी पालिका रुग्‍णालयाबाहेर आंदोलन केले. तेथे मंत्री गणेश नाईक यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.

त्यांना काळे झेंडे दाखवण्‍यात आले. त्‍यानंतर ते महापालिका मुख्‍यालयात घुसले. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली पालिका सचिव संघरत्ना खिल्लारे यांच्या दालनामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्‍या मारला. दुसरीकडे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या केबिनचाही ताबा काही शिवसैनिकांनी घेतला.

शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहून महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी यापुढे असा अवमान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. तसेच याप्रकरणी प्रशासन जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन आंदोलकांना दिले.

राजशिष्टाचारानुसार निमंत्रणपत्रिका : महापौर

शासनाच्या राजशिष्टाचारानुसार निमंत्रण पत्रिका असल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी यानंतर पत्रकार परिषद घेत सांगितले. त्‍या म्‍हणाल्‍या, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्था आयोजित कार्यक्रमात राज्य शासनाच्या राजशिष्टाचारानुसार पालकमंत्र्यांचे नाव असावे असा उल्लेख नाही. ज्यांची नावे पाहिजे, त्यांची आहेत. शिवसेनेची नावे नाही हा चुकीचा आरोप आहे. त्यांच्या अन्य लोकप्रतिनिधींची नावे छापली आहेत. तसेच महापालिकेने या कार्यक्रमाच्या दोन पत्रिका काढल्या नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT