Navi Mumbai RTO Pudhari
मुंबई

Navi Mumbai RTO: नवी मुंबईत परराज्यातील १५ वाहनांना दंडात्मक नोटिसा; आरटीओची तपासणी मोहीम

महाराष्ट्रात नियमित वापरल्या जाणाऱ्या बाहेरच्या राज्यातील वाहनांची तपासणी; पुनर्नोंदणी, कर आणि कागदपत्रांची पडताळणी

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: परराज्यात नोंदणीकृत असलेल्या वाहनांचा महाराष्ट्रात बेकायदेशीर व नियमबाह्य वापर रोखण्यासाठी नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तपासणी मोहीम तीव्र केली असून यादरम्यान नवी मुंबई शहरात अशा वाहनांची तपासणी करून १५ नियमबाह्य वाहनधारकांना दंडात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, कराची थकबाकी असल्यास ती भरावी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, यासाठी परिवहन विभागाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.

​उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत परराज्यात नोंदणीकृत असलेल्या व महाराष्ट्रात नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

वाहनांचा वापर किती काळापासून सुरू आहे, पुनर्नोंदणीची आवश्यकता आहे का, तसेच महाराष्ट्र मोटर वाहन कर अधिनियमानुसार कर भरला आहे का, याची खातरजमा यादरम्यान केली जात असून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वाहनधारकांवर प्रचलित कायदे व नियमांनुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसह मोटार वाहन निरीक्षक, सहा. मोटार वाहन निरीक्षक आवश्यक ती कारवाई करत आहेत.

​काय सांगतो कायदा?

मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम ४७ नुसार, एका राज्यात नोंदणीकृत वाहन दुसऱ्या राज्यात एक वर्षापेक्षा अधिक काळ वापरले जात असल्यास संबंधित राज्यात पुनर्नोंदणी करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात परराज्यातील वाहन आणल्यानंतर विहित नमुन्यातील अर्जाद्वारे सात दिवसांत संबंधित नोंदणी प्राधिकरणाला आवश्यक माहिती सादर करण्याची तरतूद असून, या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची पडताळणी विशेष मोहिमेद्वारे केली जात आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT