नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत कर्तव्यावर असलेल्या 1485 मतदारांनी टपाली मतदान केल्याची माहिती महापालिका निवडणूक विभागाने दिली. यामध्ये महापालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेचे सुमारे साडेचार हजार कर्मचारी आणि अधिकारी हे निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर मतदानासह मतमोजणी, आचारसंहिता भरारी पथक, तपासणी, सूक्ष्म पथकाकडून वाहनांची तपासणी, मतदान यंत्र आणि मतदान साहित्य वाटपासह इतर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. तर पोलिसांवर कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पनवेल आणि नवी मुंबई दोन महापालिका येतात. तेथील बंदोबस्ताची जबाबदारी चार पोलीस उपायुक्त, 10 सहायक पोलीस आयुक्त, 25 पोलीस निरीक्षक आणि 1200 पोलीस उपनिरीक्षकांसह कर्मचाऱ्यांवर आहे. मात्र यापैकी केवळ 1485 कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले आहे. हा आकडा निम्म्यापेक्षा कमी आहे.