नवी मुंबई: दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर विसर्जित होणाऱ्या पीओपी गणेशमूर्तींची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्याबरोबरच त्याचा पुनर्वापर करण्याच्या दिशेने नवी मुंबई महापालिकेने सकारात्मक पाऊल उचलले आहे.
विसर्जित गणेशमूर्तींमधून पीओपीची शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्प्रक्रिया करून त्याचा बेंच आणि इतर उपयुक्त वस्तूंसाठी वापर करण्याच्या प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार आहे. आवश्यक शासकीय परवानग्या घेऊन हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.
या उपक्रमासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित संस्थेचे शास्त्रज्ञ, मूर्तीकार संघटनेचे पदाधिकारी आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत विसर्जित श्रीगणेशमूर्तींमधील पीओपी वेगळा करून त्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करण्याची संपूर्ण कार्यपद्धती, पर्यावरणीय बाबी, पुनर्प्रक्रियेनंतर तयार होणाऱ्या पीओपीचा सुरक्षित वापर तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली. बैठकीत संबंधित संशोधन संस्थेमार्फत तांत्रिक प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन महिन्यांवर आलेल्या श्रीगणेशोत्सवातही उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत विसर्जनानंतर गणेशमूर्तींचे स्वतंत्र संकलन करण्यात येणार आहे. महापालिकेच्या या उपक्रमामुळे विसर्जित पीओपी मूर्तींमुळे जलाशयांवर होणारा पर्यावरणीय परिणाम कमी होण्यास मदत होणार आहे.
कचऱ्याचे संसाधनात रूपांतर करण्याच्या 'सर्क्युलर इकॉनॉमी' संकल्पनेलाही चालना मिळणार आहे. पर्यावरण संरक्षण, वैज्ञानिक पुनर्प्रक्रिया आणि सामाजिक उपयोग या बाबींचा समन्वय साधणारा हा उपक्रम आगामी काळात राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीही मार्गदर्शक ठरेल. आवश्यक शासकीय परवानग्या घेऊन हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
४ हजार किलो पीओपीतून ७६० टेबल
नवी मुंबई महापालिकेने या क्षेत्रात यशस्वी प्रयोग केला आहे. रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई, हेन्केल इंडिया प्रा. लि. आणि बीच व्हिलेज इंडिया लि. यांच्या सीएसआर निधीच्या सहकार्याने सुमारे ७०० विसर्जित गणेशमूर्तींमधून जवळपास ४ हजार किलो पीओपीवर पुनर्प्रक्रिया करण्यात आली.
या प्रक्रियेतून सुमारे ७६० स्टडी टेबल तयार करण्यात आले होते ते टेबल नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक २०४ (राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, घणसोली) येथील विद्यार्थ्यांना देण्यात आले. या उपक्रमाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणखी सुमारे ४ हजार किलो पीओपीवर प्रक्रिया करून अधिक स्टडी टेबल तयार करण्याचा प्रस्तावही संबंधित संस्थांनी दिला.