Navi Mumbai market slowdown pudhari photo
मुंबई

Pitru Paksha impact : पितृपक्षामुळे खरेदीकडे नागरिकांनी फिरवली पाठ

नवी मुंबईतील बाजारपेठेत उलाढाल मंदावली, खरेदी-विक्री व्यवहार घटल्याने अर्थकारणाला ब्रेक

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : हिंदू संस्कृतीनुसार पितृपक्ष सुरू झाल्यापासून नवी मुंबईतील सर्व बाजारपेठांमधील व्यवहारांमध्ये मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंधरवडाभर चालणाऱ्या या काळात शुभकार्य टाळले जात असल्याने सदनिका, सोने तसेच नवीन कपडे खरेदी करण्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. परिणामी, सरकारी कार्यालयांपासून बाजारपेठांपर्यंत सर्वत्र गर्दी कमी झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

पितृपक्ष हा आपल्या पितरांचे स्मरण करण्याचा कालावधी मानला जातो. पंधरवडाभर घराघरात श्राद्धकर्म, पिंडदान, खीरदान आणि ब्राह्मण भोजन यांसारखी धार्मिक कर्मे केली जातात. पितरांचा आशीर्वाद लाभावा या श्रद्धेतून लोक या काळात कोणतेही शुभकार्य न करता धार्मिक कर्मकांडाला प्राधान्य देतात. भाद्रपद महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात ही परंपरा मोठ्या प्रमाणावर पाळली जाते.

पितृपक्ष संपेपर्यंत मंदी राहणार

अमावस्येला सर्वपक्षी श्राद्ध म्हणून विशेष तर्पण केले जाते. या धार्मिक परंपरेचा थेट परिणाम बाजारपेठेवर होत असून व्यापाऱ्यांचे व्यवहारही मंदावले आहेत. कपड्यांच्या दुकानात ग्राहकांची वर्दळ थांबली आहे. तर वाहन खरेदीही थांबली आहे. मोठे मॉल्स, किरकोळ बाजारपेठा, कपड्यांची दुकाने तसेच सराफ बाजारात नेहमीची गजबज दिसत नाही.

व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की पितृपक्ष संपेपर्यंत ही मंदी कायम राहील. मात्र पितृपक्षानंतर येणाऱ्या नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारख्या सणासुदीच्या खरेदीमुळे बाजारपेठा पुन्हा गजबजतील, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पितृपक्षामुळे प्रत्येक क्षेत्रातील बाजारपेठेमध्ये ग्राहकांची फारशी वर्दळ नसल्याने अर्थकारण पूर्णपणे थंडावल्याचे पहावयास मिळत आहे.

सध्या पितृपक्ष सुरू असल्यामुळे नवीन कपडे खरेदीसाठी ग्राहक येत नाहीत. फक्त नियमित लागणारे कपडेच घेतले जात आहेत. त्यामुळे आर्थिक उलाढाल थांबली आहे.
आदिराज पार्टे, कपडे विक्रेते
सोन्याच्या खरेदी-विक्रीतही मोठी घट झाली आहे. पितृपक्षामध्ये सोने खरेदीचा वेग मंदावतो. या वर्षी देखील बाजारात मंदीच आहे.
मुलसिह दुलावत, ज्वेलर्स विक्रेते
रिअल इस्टेट क्षेत्रात जमीन व फ्लॅट खरेदी-विक्रीचे व्यवहार जवळपास ठप्प झाले आहे. तर बांधकाम व्यवसांयिक देखील या पितृपंधरवडयात व्यवहार होत नसल्यामुळे पिकनिक साठी जातात. पण पितृपक्षांनतर नवरात्री मध्ये मात्र पुन्हा व्यवहार सुरु होतात.
प्रकाश बाविस्कर, बांधकाम व्यावसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT