नवी मुंबई : नवी मुंबई शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शहरातील अनेक गृहसंकुलांमध्ये वाहनांच्या संख्येच्या तुलनेत पार्किंगची जागा अपुरी पडत असल्याने रहिवाशांकडून आपली वाहने थेट सार्वजनिक रस्त्यांवर उभी केली जात आहेत. परिणामी, रस्त्यांच्या कडेला दुहेरी रांगेत उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीचा मार्ग अरुंद होत असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली, वाशी, नेरूळ आणि बेलापूर परिसरात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नवी मुंबई शहराची नियोजनबद्ध शहर म्हणून ओळख असली तरी वाढत्या वाहन संख्येमुळे पार्किंग व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. विशेषतः जुन्या सोसायट्या तसेच वाहनांच्या तुलनेत अपुरी पार्किंग व्यवस्था असलेल्या गृहसंकुलांमधील रहिवाशांना वाहने उभी करण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे अनेकजण सोसायटीबाहेरील रस्त्यांचा वापर पार्किंगसाठी करतात. काही ठिकाणी तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी केली जात असल्याने दोन वाहने समोरासमोर आल्यास त्यांना मार्ग काढणेही कठीण होते. या बेकायदा पार्किंगचा सर्वाधिक फटका दुचाकीस्वार, रिक्षाचालक, चारचाकी वाहनचालक आणि पादचाऱ्यांना बसत आहे.
रस्त्याकडेला वाहने उभी असल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा राहत नाही. अनेकदा पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोकाही वाढतो. शाळा, बाजारपेठा, रेल्वेस्थानक परिसर तसेच वर्दळीच्या अंतर्गत रस्त्यांवर ही समस्या अधिक जाणवते.
इमारतींच्या बांधकामाला परवानगी देताना पार्किंगची तरतूद करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात अनेक सोसायट्यांमध्ये वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे जागा अपुरी पडत आहे. काही रहिवासी दुसरे किंवा तिसरे वाहन घेत असताना त्याच्या पार्किंगची व्यवस्था करत नाहीत. परिणामी सार्वजनिक रस्ते हेच खासगी वाहनांचे पार्किंग स्थळ बनत आहेत. त्यामुळे सोसायट्यांमधील पार्किंग व्यवस्थेचे नियोजन आणि सार्वजनिक रस्त्यांवरील बेकायदा पार्किंग यावर महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे उपाययोजना करणे गरजेचे आहे.
नवी मुंबईला स्वच्छ, सुंदर व नियोजनबद्ध शहर म्हणून देशात ओळख मिळाली आहे. मात्र, रस्त्यांवर अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या वाहनांमुळे शहराच्या सौंदर्यालाही बाधा पोहोचत आहे. स्वच्छतेप्रमाणेच वाहतूक शिस्त आणि पार्किंग व्यवस्थेलाही प्राधान्य देऊन नवी मुंबई महापालिका व वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
सोसायट्यांमध्ये पार्किंगची जागा अपुरी असल्याचे कारण देत अनेक रहिवासी आपली वाहने सार्वजनिक रस्त्यांवर उभी करतात. काही ठिकाणी तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने लावली जात असल्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. अतिरिक्त वाहने घेण्यापूर्वी पार्किंगची व्यवस्था करणे ही वाहनधारकांची जबाबदारी आहे. महापालिका व वाहतूक पोलिसांनी अशा बेकायदा पार्किंगवर कठोर कारवाई करावी.दीपक औटी, नागरिक
नवी मुंबईसारख्या नियोजनबद्ध शहरात पार्किंगचा प्रश्न गंभीर होणे ही चिंतेची बाब आहे. सकाळी व संध्याकाळी कार्यालयीन वेळेत रस्त्यांवर उभ्या वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी होते. ज्येष्ठ नागरिक, महिला व शाळकरी मुलांना रस्त्यावरून चालताना अडचर्णीचा सामना करावा लागतो. महापालिकेने प्रत्येक विभागात पार्किंगसाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी आणि रस्त्यांवरील बेकायदा पार्किंगविरोधात नियमित मोहीम राबवावी.दादा सावंत, नागरिक