शरद वागदरे
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीची घोषणा झाली असून युतीत तह झाल्याचे बोलले जात आहे. कल्याण डोंबिवलीत फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू आहे. मात्र नवी मुंबईचे काय हा दोन्ही पक्षश्रेष्ठींपुढे मोठा पेच असणार आहे. महायुती झाल्यास नाराजांचा फटका भाजपला अधिक बसण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईत 111 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. 2015मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कांॅग्रेसकडे 52, शिवसेना 37, भाजपकडे 7, काँग्रेसकडे 10, अपक्ष 5 असे पक्षीय बलाबल होते. मात्र गणेश नाईक सर्व नगरसेवक घेऊन राष्ट्रवादीतून भाजपत गेले. त्यानंतर राष्ट्रवादी व शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे महापालिकेतील 2015 चे पक्षीय बलाबल आता अजिबातच राहिलेले नाही.
सध्या भाजपकडे 61, तर शिवसेना शिंदे गटाकडे 48 माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे नवी मुंबईत महायुती भक्कम स्थितीत आहे. मात्र गणेश नाईक गट व शिंदेसेना यांच्यात विळ्या भोपळ्याचे राजकीय वैर आहे. त्यांच्यात मनोमीलन अशक्य बाब आहे. त्यामुळे नवी मुंबईत महायुती होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे; जास्त करून भाजप व शिंदे सेनेतील इच्छुकांचे. कारण महायुती झाल्यास अनेकांचे पत्ते कट होणार आहेत. याचा सर्वाधिक फटका हा भाजपला बसणार आहे. दुसरीकडे ठाकरे गट, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात आघाडीची दाट शक्यता आहे.
भाजपचे नेते तसेच राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. तर भाजपने इच्छुक उमदेवारांच्या मुलाखती देखील घेतल्या आहेत. संघटनात्मक तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे पक्षनेतृत्वाकडून महायुतीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे नवी मुंबईत मोठा पेच निर्माण होणार आहे. सध्या भाजपकडे 61 नगरसेवक आहेत. कल्याण डोंबिवलीत फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला नवी मुंबईत राबवल्यास याचा मोठा फटका भाजपला बसणार आहे. त्यामुळे स्थानिक नेतृत्व महायुतीसाठी अजिबात तयार नाही.
सांगली पॅटर्नची चर्चा
नवी मुंबई महानगरपालिकेत महायुती झाल्यास अनेक भाजप व शिवसेना शिंदे गटांच्या इच्छुक उमदेवारांचे तिकीट कापले जाणार आहे. त्यामुळे हे इच्छुक उमेदवार महाविकास आघाडीमधून तिकीट न मिळाल्यास किंवा पक्षांच्या तिकिटाऐवजी अपक्ष देखील उमदेवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. खासदारकीच्या निवडणुकीत सांगलीमधील विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार निवडून आले होते. खासदारकीला अपक्ष निवडून येऊ शकतात तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पॅनलमध्ये अपक्ष म्हणून का निवडून येऊ शकत नाही, अशी चर्चा सुरू आहे.