नवी मुंबई: महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या एप्रिल ते ऑक्टोबर या पहिल्या सात महिन्यांत महापालिकेच्या आठ विभागांतील 1 लाख 63 हजार 23 मालमत्ताधारकांकडून आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एका आर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यांत 500 कोटी 11 लाख रुपयांचा मालमत्ताकर वसूल केल्याचे मालमत्ताकर विभागाने स्पष्ट केले. यामध्ये सर्वात जास्त मालमत्ता कर नेरूळ विभागातून 106 कोटी 79 लाख रुपये जमा झाला तर ऑनलाईन करभरणा माध्यमातून 313 कोटी 70 लाख रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात कर संकलन झाले.
मालमत्तेच्या प्रकारानुसार नवी मुंबईत निवासी मालमत्ता 35 टक्के, अनिवासी / व्यावसायिक मालमत्ता 23.84 टक्के, औद्योगिक मालमत्ता 32.45 टक्के आणि मिश्र व इतर मालमत्ता 8.71 टक्के एवढी मालमत्ताकर वसूली झाली.
मालमत्ताकर विभागाच्या या यशामागे नागरिकांच्या सहभागासोबतच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नियोजनबद्ध धोरणे महत्त्वाची ठरली असून या उपाययोजनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे यांनी सांगितले. उर्वरित पाच महिन्यांत कर वसूलीचे निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार योग्य नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल असे मालमत्ताकर विभागाचे उपायुक्त डॉ.अमोल पालवे यांनी सांगितले.
कर संकलनात वाढ होण्यासाठी महानगरपालिकेने यंदा डेटा विश्लेषणावर आधारित नाविन्यपूर्ण पध्दतीने कार्यवाही करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये करसंकलनात वाढ साध्य करण्यासाठी डेटा विश्लेषण, मालमत्ताधारकांची माहिती अद्ययावत करणे व जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या.मोबाईल ॲप्लिकेशन अशा सर्व घटकांच्या माध्यमातून करसंकलनात लक्षणीय वाढ झाली.
सर्वाधिक करसंकलन नेरूळ विभागातून
नमुंमपाच्या आठ विभागांतील 1 लाख 63 हजार 23 मालमत्ताधारकांकडून 500 कोटी 11 लाख रुपयांचे कर संकलन झाले. त्यामध्ये सर्वात जास्त 106 कोटी 79 लाख रुपये मालमत्ता कर नेरूळ विभागातून मिळाला.तर ऑनलाईन माध्यमांतून झालेले कर संकलन 313 कोटी 70 लाख रुपये आणि ऑफलाईन माध्यमांतून झालेले कर संकलन 186 कोटी 41 लाख रुपये इतके आहे.
नवी मुंबई महापालिकेचे उद्दिष्ट केवळ कर संकलनात वाढ करणे नाही, तर नागरिकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सोयीस्कर व सुलभ सेवा उपलब्ध करून देणे हे आहे. भविष्यात स्मार्ट सिटी संकल्पनेशी सुसंगत असे अधिक डिजिटल उपक्रम राबविण्याचे नियोजन असून ज्यायोगे नागरिकांचा वेळ वाचेल आणि कामकाज अधिक पारदर्शक बनेल. करसंकलनातील हे यश केवळ महापालिकेचे नाही, तर प्रत्येक जबाबदार करदात्याचे आहे. नागरिकांनी वेळेवर कर भरून दाखवलेली जबाबदारीची जाणीव व विश्वास समाधानकारक असून शहर विकासाला हातभार लावणारा आहे.डॉ.कैलास शिंदे, महापालिका आयुक्त