नवी मुंबई: राजेंद्र पाटील
नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौरपदावर कुणाची वर्णी लागणार यावर चर्चा रंगू लागली आहे. 31 जानेवारीला महापौरपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे उद्या 25 जानेवारी रोजी भाजपचे नवी मुंबईतील 66 नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी मुंबईत जाणार आहेत. नवी मुंबईतील नेत्यांनी 36 महिला नगरसेविकांची चाचपणी करून महापौरपदासाठी निवडक 11 महिला नगरसेविकांची यादी केली असून त्यापैकी महापौरपदासाठी एका नावावर यावेळी शिक्कामोर्तब होणार आहे.
शुक्रवारी नवी मुंबई भाजपच्या 66 नगरसेवकांनी गट स्थापन करून कोकण भवन येथे नोंदणी केली. यावेळी गटनेता म्हणून माजी महापौर सागर नाईक यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. उद्या भाजपचे नेते आणि मंत्री गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक आणि सागर नाईक यांच्यात महापौरपदाबाबत बैठक होणार आहे. या बैठकीत नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, संदीप नाईक, सागर नाईक आणि संजीव नाईक यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीचा अहवाल ठेवला जाणार आहे.
शुक्रवारी झालेल्या बैठकीत एकूण 36 महिला नगरसेविकांपैकी नऊ नगरसेविकांची यादी स्थानिक भाजप कमिटीने तयार केली आहे. या यादीत उद्या गणेश नाईक हे आणखी दोन नवीन नावांचा समावेश करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे महापौरपदाच्या शर्यतीत 11 महिला नगरसेविका असतील. रविवारी या 11 नगरसेविकांची यादी मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर महापौरपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रेखा म्हात्रे, सलूजा सुतार, अदिती नाईक, अंजनी भोईर, दयावती शेवाळे, नेत्रा शिर्के, वैष्णवी नाईक, शुभांगी पाटील, ॲड. भारती पाटील, माधुरी सुतार या महिला नगरसेविका महापौरपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत.
माधुरी सुतार यांच्या नावाची शिफारस?
नवी मुंबई महापौरपदासाठी माधुरी सुतार यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. नवी मुंबई भाजपकडून प्रदेश कार्यालयाला प्रस्ताव पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले. माधुरी सुतार या शिरवणे गावातून नगरसेविका आहेत. त्या भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षाही होत्या. सुतार यांच्या प्रस्तावामुळे महापौर निवडणुकीच्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. आता भाजप प्रदेश कार्यालयाकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.