Navi Mumbai Airport Inauguration
मुंबई : दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. आज दुपारी पंतप्रधानांचे विमान थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. या विमानतळामुळे मुंबईतून बाहेर जाणाऱ्या आणि मुंबईत उतरणाऱ्या प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (BOM) आणि नवी मुंबई विमानतळ (NMI) असे दोन पर्याय असतील.
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन म्हणजे महामुंबईचे महाउड्डाण मानले जाते. आज घडीला देशातील सर्वांत व्यग्र म्हणजे सर्वाधिक उड्डाणांचे विमानतळ म्हणून दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. आज नवी मुंबई विमानतळाच्या फक्त टर्मिनल-१ चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. प्रत्यक्ष विमान वाहतूक नोव्हेंबरच्या मध्यात सुरू हाईल. त्यानंतर पाच-सात वर्षांतच मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ दुय्यम ठरेल आणि नवी मुंबई हेच महामुंबईचे मुख्य विमानतळ म्हणून जगाच्या नकाशावर ओळखले जाईल.
पंतप्रधान मोदींनी नवी मुंबई विमानतळावर उतरताच प्रथम टर्मिनल-१ची आणि संपूर्ण विमानतळाची पाहणी केली. यावेळी आणि उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार तसेच केंद्रीय मंत्री आणि राज्यातील अनेक मान्यवर उपस्थिती होते.