नेरुळ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी विमानाने पहिले उड्डाण केले आणि नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने विमानतळ प्रवाशांसाठी खांदेश्वर रेल्वे स्थानक (पुर्व) ते नवी मुंबई विमानतळ स्टाफ पार्किंग अशी वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे. आगामी कालावधीत उरण, पनवेल बेलापूर वाशी येथून देखील बस सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
मार्ग क्रमांक 5 अशी वातानुकूलित खांदेश्वर रेल्वे स्थानक पूर्व ते नवी मुंबई विमानतळ स्टाफ पार्किंगपर्यंत एनएमएमटीची बस धावणार आहे. एकूण 48 फेऱ्या दिवसभरात होणार आहेत. खांदेश्वर रेल्वे स्थानक, म्हाडा वसाहत, उड्डाणपूल, मोठा खांदा गाव, हायवे जोड रस्ता, कर्नाळा स्पोर्ट रोड पूल, सदानंद निवास सेक्टर आर 3 करंजाडे, गजन निर्मला सोसायटी करंजाडे, करंजाडे बस स्थानक सर्कल, पुरंदर रोड सर्कल, नवी मुंबई विमानतळ आपत्कालीन गेट, कार्गो विमानतळ गेट चेक नाका, ट्रक टर्मिनल, कार्गो टर्मिनल, नवी मुंबई विमानतळ स्टाफ पार्किंग, असा बसचा मार्ग असणार आहे.
या बससेवेमुळे खांदेश्वर येथून नवी मुंबई विमानतळ येथे कामानिमित्त जाणाऱ्या चाकरमानी तसेच इतर प्रवाशांना अधिक फायदा होणार आहे.
अशी असेल सेवा
खांदेश्वर रेल्वे स्टेशन सकाळी 6.32 वाजता पहिली बस सुटेल व शेवटची बस रात्री 10.47 वाजता सुटेल तर नवी मुंबई विमानतळ स्टाफ पार्किंग येथून सकाळी 6.58 मिनिटांनी पहिली बस सुटेल तर रात्री 11.13 वाजता शेवटची बस आहे. 35 ते 40 मिनिटाच्या प्रवासासाठी वातानुकूलित बस सुविधाही दर 45 मिनिटांनी प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे.