नवी मुंबई : नवी मुंबईत जागोजागी पदपथांवर चालणारे गॅरेज नागरिकांची डोकेदुखी ठरू लागली आहेत. दुरुस्तीसाठी येणारी वाहने रस्त्यावर तसेच पदपथांवर उभी केली जात आहेत. यामुळे रहदारीला अडथळा होत असतानाच रात्री-अपरात्री चालणाऱ्या दुरुस्तीच्या कामांमुळेही रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
एकविसाव्या शतकाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील बहुतांश रस्ते, पदपथ, मोकळी मैदाने गॅरेज चालकांनी व्यापली आहेत. त्यापैकी सर्वाधिक गॅरेज रहिवासी जागेत कोणत्याही परवानगी शिवाय अनधिकृतपणे चालवली जात आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचेही पाहायला मिळत आहे. परिणामी, गॅरेजची वाढती संख्या शहरवासीयांची डोकेदुखी ठरू लागली आहे.
गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी येणारी चारचाकी तसेच दुचाकी वाहने रस्त्यालगत अथवा पदपथांवर उभी केली जात आहेत. त्यापैकी नादुरुस्त वाहनांचे भंगार वर्षानुवर्षे रस्त्यालगतच साठवले जाते. यामुळे पादचाऱ्यांना तसेच वाहनांच्या रहदारीला अडथळा होत आहे. काही ठिकाणी महापालिका व वाहतूक पोलिसांकडून अनेकदा कारवाई झाली आहे. मात्र, कारवाईनंतर दुसयाच दिवशी पुन्हा त्या ठिकाणी गॅरेजची दुकाने थाटल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून प्रशासनाकडूनच त्यांना अभय मिळत असून कारवाईचा केवळ दिखावा होत असल्याचा आरोप होत आहे.
सद्यस्थितीला शहरातील प्रत्येक गावांभोवती असे प्रत्येक नोडमध्ये गॅरेज पाहायला मिळत आहेत. वाशी सेक्टर 17, कोपरखैरणे, जुहूगाव, नेरुळ डी. वाय. पाटील समोर तसेच सेक्टर 13, बेलापूर व घणसोली नोड यासह पाम बीच मार्गाचाही त्यात समावेश आहे. सर्वच गॅरेज मुख्य रस्त्यालगत तसेच अंतर्गतच्या रस्त्यावर असल्याने वाहन दुरुस्तीची कामेही रस्त्यावरच केली जातात. दुरुस्तीदरम्यान रस्त्यावर सांडलेले ऑइल अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. काही गॅरेज रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्यांच्याकडून अवजारांच्या ठोकाठोकीचा आवाज तसेच जोरजोराने लावल्या जाणाऱ्या गाण्यांमुळे परिसराची शांतता भंग होत आहे. याचा सर्वाधिक त्रास रुग्ण व्यक्तींसह लहान मुले व वृद्ध व्यक्तींना होत आहे.
महापालिकेने पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच पदपथावरून दुचाकी चालवल्या जाऊ नयेत, याकरिता लोखंडी बेरियर्स बसवले आहेत; परंतु अनेक ठिकाणी असे लोखंडी बेरियर्स तोडून गॅरेजच्या दुकानाची वाट मोकळी करून देण्यात आलेली आहे. अशाच गॅरेजमुळे पाम बीच मार्गावर एपीएमसी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्या ठिकाणी अनेकदा कारवाई करूनही ते बंद करण्यात महापालिका व वाहतूक पोलीस अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.
जादा भाड्याच्या लालचेपोटी रहिवासी इमारतीमधील व्यावसायिक गाळे गॅरेजला भाड्याने दिले जातात. त्यामुळे जागा मिळेत तिथे गॅरेजची दुकाने थाटली जात आहेत. परिणामी, शहरातील प्रत्येक गावासह सिडको विकसित नोडला गॅरेजचा विळखा बसला आहे. तेथे उभी केली जाणारी वाहने, भंगार यामुळे परिसरालाही बकालपणा आला आहे.
पदपथावरच गॅरेज चालक हे त्यांचे बस्तान मांडून बसत असल्यामुळे रस्त्याने चालणेही जिकिरीचे होत आहे. पदपथ तसेच रस्त्यावरही त्यांनी हातपाय पसरले आहेत. त्यामुळे चालायचे कसे, असा प्रश्न पडत आहे. गॅरेज चालकांमुळे वाहतुककोंडीचा प्रश्न भेडसावत आहे.अरुण साळुंखे, पादचारी