नवी मुंबईत पारंपरिक ‌‘आगोटी‌’ची लगबग  pudhari photo
मुंबई

Agoti Tradition Maharashtra : नवी मुंबईत पारंपरिक ‌‘आगोटी‌’ची लगबग

सुकी मासळी खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : मान्सून आता अगदी दारात येऊन ठेपला असून नवी मुंबईत पावसाळ्यापूर्वीच्या पारंपरिक ‌‘आगोटी‌’ ची लगबग सुरू झाली आहे. आभाळात काळे ढग दाटू लागले आहेत, समुद्राच्या वाऱ्याला ओलसर गारवा लाभू लागला आहे आणि गावगावठाणांत पावसाळ्याची चाहूल स्पष्ट जाणवत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील कोळीवाडे, बाजारपेठा व घराघरांत पावसाळ्याच्या स्वागताची तयारी जोर धरू लागली आहे.

नवी मुंबईतील बाजारपेठांमध्ये सध्या कडधान्यांच्या पोत्यांच्या राशी दिसून येत आहेत. मसाल्यांचा खमंग दरवळ, घरगुती लोणच्याचा सुगंध आणि सुकी मासळीच्या खरेदीला आलेला जोर यामुळे आगोटीच्या खरेदीला चांगलेच उधाण आले आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने ताज्या माशांची आवक कमी होते. त्यामुळे बोंबील, सुकी कोळंबी, जवळा आणि सुकट यांसारख्या सुक्या मासळीचा साठा करण्याकडे कोळी बांधवांसह नागरिकांचा कल वाढला आहे.

यावेळी दिवाळे कोळीवाडा, सारसोळे, करावे, वाशी आणि घणसोली येथील बाजारांत पहाटेपासूनच ग्राहकांची गर्दी होत आहे. महिलावर्ग मसाले दळणे, पापड-कुरडया तयार करणे तसेच लोणची मुरवण्याच्या कामात व्यस्त असून, घराघरांत पावसाळ्याच्या तयारीचा उत्साह दिसून येत आहे.

दुसरीकडे, कोळीवाड्यांत सुकी मासळी वाळवण्याची आणि साठवण्याची धावपळ सुरू आहे. खाऱ्या वाऱ्यासोबत दरवळणारा बोंबील आणि कोळंबीचा सुगंध परिसराला पारंपरिक आगोटीची झलक देत आहे. दरम्यान, हवामान खात्याने लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवल्याने नागरिकांकडून छत्र्या, रेनकोट, धान्यसाठा आणि घरगुती साहित्य खरेदीलाही वेग आला आहे.

शहराच्या आधुनिक धावपळीतही नवी मुंबईत आगोटीची पारंपरिक संस्कृती आजही जपली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.‌‘नवी मुंबईकरांसाठी आगोटी म्हणजे केवळ तयारी नाही, तर आठवणी, परंपरा आणि पावसाळ्याच्या स्वागताचा भावनिक उत्सव आहे,‌’ असे सुनीता नीलकंठ गझणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT