Sindhudurg News : गाव-घरे पुन्हा सामसूम होताना...

‘अधिक मास’मुळे धार्मिक कार्यक्रमांना ब्रेक : चाकरमान्यांचा परतीचा प्रवास
Sindhudurg News
चाकरमान्यांचा परतीचा प्रवास
Published on
Updated on

नितीन सावंत

कणकवली : अधिक मासमुळे मे महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात विवाह सोहळे, वास्तूशांती, मंदिरांमधील धार्मिक उत्सव असे एक ना अनेक कार्यक्रमांची मोठी रेलचेल होती. साहजिकच मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने चाकरमानी या कार्यक्रमांसाठी दाखल झाल्याने गाव-घरे गजबजून गेली होती. आता १६ मे पासून अधिक मास सुरू झाला आणि हे सर्व कार्यक्रम थांबले. त्यातच वाढता उष्मा, पाणी टंचाई व दहावी- बारावीचे निकाल लागल्याने पुढील शिक्षणाच्या प्रवेशाची धावाधाव यामुळे चाकरमान्यांनी दरवर्षीपेक्षा काहीसा लवकरच आपला उन्हाळी सुट्टीतील परतीचा प्रवास सुरू केला. साहाजिकच गेले काही दिवस गजबजून गेलेली घरे हळूहळू कुलूपबंद होवू लागली आणि पून्हा एकदा गाव-घरे सामसूम होवू लागली.

मुंबईच्या जडणघडणीत कोकणवासियांचा नेहमीच मोठा वाटा राहिला आहे. मुंबई कोकणचाच एक भाग आहे. अगदी इंग्रज राजवटीतही मुंबईच्या प्रशासकीय आणि एकुणच व्यवस्थेमुळे कोकणवासिय सक्रीय राहिले आहेत. त्याकाळात कोकणातील तरूण नोकरीसाठी मुंबईत दाखल व्हायचे. एखाद्या नातेवाईकाच्या, ओळखीच्या कुटुंबात निवासाची व्यवस्था असायची, बाकी सर्व कुटुंबिय गावीच असायचे. मुंबईतून त्याने पाठविलेल्या मनीऑर्डरवर गावातील कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. दर महिन्याच्या ठराविक कालावधीत हे कुटुंबिय पोस्टमनची आतुरतेने वाट पाहायचे. वाडीमध्ये पोस्टमन येताना दिसले की हायसे वाटायचे. मुंबईवरून झिलाने मनीऑर्डर पाठविली असणार हा विश्वास असायचा. आई- वडिलांसह भाऊ- बहिण, विवाह झाल्यानंतर पत्नी, मुले, काही घरांमध्ये आजी - आजोबा असे सारे कुटुंबिय गावी असायचे. त्यामुळे वाडीवाडीतील घराघरात माणसांचा वावर असायचा. यासोबच गुरेढोरे, शेतीवाडी, गडीमाणसे, रोजंदारीवर काम करणारे मजूर, असा मोठा राबता गावात असायचा. मुंबईत राहणारे चाकरमानी त्या काळात पावसाळ्यात भात लावणीसाठी आणि दिवाळीत भात कापणीसाठी आवर्जुन गावी यायचे. शेतीची कामे आटोपून ते पुन्हा आपल्या मुंबई, ठाणे शहरातील नोकरीवर पुन्हा रूजू व्हायचे.

कालांतराने मुंबईत राहणाऱ्यांनी आपल्या निवासाची व्यवस्था केली आणि हळूहळू मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अथवा इतर कारणामूळे चाकरमान्यांचे गावी रहाणारे कुटुंब मुंबईत पोहोचले. हा बदल होत असताना गावात आई- वडिल एखादा मुलगा व त्याचे कुटुंब अशी मोजकीच माणसे राहू लागली. याच दरम्या ‘मुंबईत स्वतःची खोली असेल तरचं मुलगी देणार’ हा विचारप्रवाह वधूच्या घरातून सुरू झाला. त्यामुळे अगोदर स्वतःचे घर मिळवायचे आणि नंतरच वधूचा शोध सुरू होवू लागला. साहजिकच पुढची पिढी सुध्दा शहरात स्थायिक झाली. गावात राहीलेली वयोवृध्द माणसे हळूहळू आपला जीवनप्रवास संपवून स्वर्ग लोकात दाखल होवू लागल्याने घरे कुलूपबंद होण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यातच शहरातील नोकरी, व्यवसायातून वयोमानानूसार सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ नागरीक गावाकडे येवून स्थायिक होण्याचे प्रमाणही कमी झाले. आजारपणात चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. अचानक आजारपण आले, रात्री-अपरात्री त्रास झाला तर उपचारासाठी कुठे जायचे? असे प्रश्न असल्याने मनात असूनही नाईलाजाने अनेक ज्येष्ठ नागरीकांनी शहरातच राहणे पसंत केले. त्यासोबतच घरातील नातवंडांना साभाळण्याची जबाबदारी असल्याने गावी येवून राहण्याची उमेद कमी झाली. याचा परिणाम म्हणून गावातील घरे बंद राहण्याचे प्रमाण वाढतच गेले.

यावर्षी अधिक ज्येष्ठ महिना १६ मे पासून सुरू झाला. हिंदू वर्षात अधिक महिन्यामध्ये मंगलकार्य होत नाहीत. या महिन्यात विवाह, साखरपुडा, बारसे, मुंज असे कार्यक्रम होत नाहीत. त्यामुळे साहाजिकच १६ मे पासून अशा कार्यक्रमांना पूर्णविराम मिळाला. तत्पुर्वी एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याचा पहिला पंधरावडा या कालावधीत कार्यक्रमांची मोठी वर्दळ होती. एकाच दिवशी वाडीत कुणाच्या घरात विवाह तर कुणाच्या घरात पूजा, वास्तूशांती, सार्वजनिक उत्सव असे अनेक कार्यक्रम असल्याने शहरातून मोठ्या संख्येने नागरीक गावाघरात दाखल झाले होते. मात्र १६ मेनंतर रेल्वे, एसटीबस, खाजगी बस व खाजगी वाहनातून मोठ्या संख्येने चाकरमानी शहरात परतु लागल्याने गाव-घरे पुन्हा एकदा सामसूम होणे सुरू झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news