नवी मुंबई : निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठ्या संख्येने शासकीय, निमशासकीय कर्मचारी कार्यरत असतात. निवडणूक कर्तव्यावर कार्यरत कर्मचाऱ्यांचा मतदार म्हणून मतदानाचा हक्क डावलला जाऊ नये यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार टपाली मतदान सुविधा नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्राधान्याने रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्य़ांप्रमाणेच नवी मुंबईतील सिडको व इतर शासकीय-निमशासकीय कार्यालये, खासगी शाळा येथील कर्मचाऱ्यांची निवडणूक कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे.
अशा कर्मचाऱ्यांसाठी तसेच जे कर्मचारी नवी मुंबईचे मतदार आहेत, मात्र त्यांची नेमणूक निवडणूक कर्तव्यावर झालेली आहे अशा कर्मचा-यांना मतदान करता यावे याकरिता नवी मुंबई महापालिकेच्या आठही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात विशेष टपाली सहाय्यता मतदान कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती या विषयाच्या नोडल अधिकारी तथा उपायुक्त स्मिता काळे यांनी दिली.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मतदार म्हणून नोंदणी असलेले अधिकारी, कर्मचारी यांनी अंतिम मतदारयादीत आपले नाव व नंबर तपासून ते ज्या प्रभागात मतदार आहेत त्या प्रभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे 8 जानेवारी 2026 रोजी प्रपत्र पीबी 1 नमुन्यात आपले सूचनापत्र / अर्ज देऊन मतपत्रिकेची मागणी करावयाची आहे. यासोबत त्यांनी आपला निवडणूक कर्तव्यावर नियुक्ती झाल्याचा आदेश जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत टपाली मतपत्रिका देण्यात येईल.
अर्जदारांना आपले टपाली मतदान नोंदवण्यासाठी आठही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात विशेष टपाली मतदान सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. तेथे 8, 9, 10, 11, 12 जानेवारी या पाच दिवसांत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहिल्यास टपाली मतदानाबाबत मार्गदर्शन व सहाय्य मिळेल. नवी मुंबई महापालिका मुख्यालय स्तरावरही विशेष टपाली मतदान सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला असून याबाबतची माहिती व अडचणींसाठी 9819452487 हा हेल्पलाईन क्रमांक कार्यालयीन वेळेत कार्यरत करण्यात आला आहे.